You are currently viewing काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार

क्रियापदावरून क्रियेचा बोध होत असताना ती क्रिया केव्हा घडते हे कळणेही महत्त्वाचे असते. ती क्रिया केव्हा घडते, हे पहाणे म्हणजेच क्रियापदाचा काळ ठरवणे होय. सर्वसाधारणपणे काळाचे वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ असे तीन प्रकार पडतात.

क्रियापदाचे काळ

वर्तमान काळ

जी क्रिया वर्तमानात घडत असते किंवा जी घटना चालू काळात घडत असते त्या क्रियेच्या काळाला वर्तमान काळ असे म्हणतात वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत.

साधा/ सामान्य वर्तमान काळ

वर्तमानात जी क्रिया सामान्यपणे घडत असते त्या क्रियेला साधा वर्तमान काळ असे म्हणतात.

उदाहरणे :-

 1. आई जेवण बनवते.
 2. सूर्य पूर्वेला उगवतो.
 3. रमेश बाजारातून भाजी घेऊन येतो.
 4. आजोबा मुलांसाठी खेळणी आणतात.

अपूर्ण वर्तमानकाळ

जी क्रिया वर्तमान काळात घडत असेल आणि ती अपूर्ण किंवा चालू असेल तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ होतो.

उदाहरणे :-

 1. विद्यार्थी अभ्यास करत आहेत.
 2. रमेश आंबा खात आहे.
 3. मी रस्त्याने चालत आहे.
 4. सुजाता गाणे गात आहे.

पूर्ण वर्तमान काळ 

एखादी क्रिया वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झाली असेल तेव्हा पूर्ण वर्तमान काळ होतो.

उदाहरणे :-

 1. बाबांनी वर्तमान पत्र वाचले आहे.
 2. गीताचे खेळून झाले आहे.
 3. माझा अभ्यास करून झाला आहे.
 4. समीरचा कार्यक्रम आटोपला आहे.

रीती वर्तमान काळ

एखादी क्रिया वर्तमान काळात परंतु दररोज घडते हे दाखविण्यासाठी हा काळ वापरतात.

उदाहरणे :-

 1. तो नेहमीच उशिरा येतो.
 2. राम दररोज पूजापाठ करतो.
 3. माझी आई कायम जेवण बनवते.
 4. संगिता रोज गायनाचा सराव करते.

वर्तमान काळाशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी

 • स्थिर किंवा त्रिकालबाधित सत्य प्रस्थापित करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात.उदाहरणार्थ – चंद्र पृथ्वीभोवती फिरतो प्रकाशाच्या विरुद्ध बाजूला सावली पडते.
 • ऐतिहासिक घटना जरी भूतकाळात घडलेली असली तरी ती आपण वर्तमान काळात सांगतो. उदाहरणार्थ – अर्जुन कृष्णाला म्हणतो यात खरे म्हणजे म्हणाला असा अर्थ आहे.
 • लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना म्हणजे जवळचा भविष्यकाळ वापरण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ – तुम्ही पुढे व्हा मी येतोच या लांब संनिहित भविष्यकाळ असे म्हणतात.
 • नुकतीच घडलेली क्रिया सांगताना म्हणजेच लगतचा भूतकाळ व्यक्त करण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. याला संनिहित भूतकाळ असेही म्हणतात. उदाहरणार्थ – मी नाटकाला जाण्यास निघालो, तोच माझा मित्र हजर झाला.

भूतकाळ

जी क्रिया इतिहासात किंवा मागील काळात अगोदरच घडून गेलेली आहे, त्या क्रियेला भूतकाळ असे म्हणतात.

साधा भूतकाळ

क्रिया अगोदरच घडून गेलेली आहे हे दर्शवताना साधा भूतकाळ वापरला जातो.

उदाहरणे :-

 1. मीनाने अभ्यास केला.
 2. राम आणि सीता वनवासात गेले.
 3. आईने माझ्यासाठी नवीन कपडे आणले.
 4. गुरुजींनी तो धडा शिकवला.

अपूर्ण भूतकाळ 

एखादी क्रिया मागील काळात घडत असून ती चालू किंवा अपूर्ण असते असे दिसून येते त्यावेळी अपूर्ण भूतकाळ होतो.

उदाहरणे :-

 1. सुरेश काम करत होता.
 2. बाबा वर्तमानपत्र वाचत होते.
 3. त्यादिवशी गारा पडत होत्या. 
 4. गोपाळ बासरी वाजवत होता.

पूर्ण भूतकाळ

ज्यावेळी मागील काळात घडत असलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असेल तेव्हा पूर्ण भूतकाळ होतो.

उदाहरणे :-

 1. मी जेवण केले होते.
 2. सुनिताने सजावट केली होती.
 3. आजोबांनी मेहनत घेतली होती.
 4. त्यावेळी अंधार पडला होता.

रीती भूतकाळ 

एखादी क्रिया भूतकाळात परंतु नेहमी घडत असेल तेव्हा हा काळ वापरला जातो.

उदाहरणे :-

 1. मी रोज देवळात जात असे.
 2. राधा नेहमी नाटक पाहत असे.
 3. रेश्मा दररोज सराव करत होती.
 4. गावच्या गाड्या कायम चालू असत.

भूतकाळाशी निगडीत काही महत्वाच्या गोष्टी

 • संहित भविष्यकाळ दर्शवण्यासाठी वर्तमान काळाप्रमाणे भूतकाळाचा ही उपयोग केला जातो उदाहरणार्थ – तू अभ्यास कर, मी आलोच. या वाक्यात मी येईन, असा भविष्यकाळ बोध आहे.
 • एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने होणार या अर्थी निसंशय भविष्यकाळ सांगताना भूतकाळ वापरतात. उदाहरणार्थ – तेथे वेडेपणा कर; मग शिक्षा झालीच म्हणून समज.

भविष्यकाळ

ज्या क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया भविष्यात होणार आहे असे दर्शवले जाते, त्या क्रियापदाचा रूपाला भविष्यकाळ असे म्हणतात.

साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी किया पुढील काळात घडावयाची असते, त्या वेळी साधा भविष्यकाळ वापरतात. 

उदाहरणार्थ :- 

 1. उद्या पाऊस पडेल. 
 2. मी नाटक पाहीन. 
 3. निशा गाणे गाईल.
 4. बाबा खेळणी आणतील.

अपूर्ण भविष्यकाळ

पुढील काळातील क्रिया जेव्हा सतत चालू असेल किंवा अपूर्ण असेल, त्या वेळी अपूर्ण भविष्यकाळ होतो. 

उदाहरणार्थ- 

 1. तो अभ्यास करत असेल. 
 2. मी रस्त्याने जात असेन.
 3. मीना खूप मौज मजा करत असेल.
 4. आपण खूप मोठ्या व्यवसायात उडी घेतलेली असेल.

पूर्ण भविष्यकाळ :

क्रिया पुढील काळात घडावयाची असली तरीही ती त्या काळात पूर्ण झालेली असेल, असा बोध जेव्हा क्रियापदावरून होतो तेव्हा पूर्ण भविष्यकाळ होतो. 

उदाहरणार्थ- 

 1. त्याने अभ्यास केलेला असेल. 
 2. मी गावाला पोहोचलो असेन.
 3. माझे शेतात काम करून झाले असेल.
 4. आंब्यांचा हंगाम संपला असेल

रीती भविष्यकाळ :

ज्या वेळी एखादी क्रिया भविष्यकाळात नेहमी घडणार आहे. असा बोध क्रियापदावरून होतो तेव्हा रीती भविष्यकाळाचा उपयोग केला जातो. 

उदाहरणार्थ– 

 1. मी रोज अभ्यास करीत जाईन. 
 2. राधा नेहमी वर्तमानपत्र वाचेल.
 3. तो रोज खेळ खेळायला जाईल.
 4. सीताला रोज लाकडे गोळा करावी लागतील.

भविष्यकाळाशी निगडित काही महत्वाच्या गोष्टी

 • अशक्य गोष्ट असेल तर भविष्यकाळाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ- या पृथ्वीवर शहाणे लोक नसतील का?
 • इच्छा व्यक्त करताना हा काळ वापरतात. उदाहरणार्थ- मी रामायण वाचायला हवे.
 • संकेतार्थ व्यक्त करावयाचा असल्यास भविष्यकाळ वापरतात. उदाहरणार्थ- पाऊस पडेल, तर पीक भरपूर मिळेल.

Leave a Reply