You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती व त्यांचे सद्य परिस्थितीपुरक विचार

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती व त्यांचे सद्य परिस्थितीपुरक विचार

जगातील प्रत्येक शिवभक्तास माझा मनाचा मुजरा. शिवाजी महाराज हा बुद्धीचा आणि शक्तीचा असा पेच आहे, की तो प्रत्येकास समजणे कठीण. शिवभक्तांनो, मी छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती अगदी जन्मापासून तुम्हाला येथे देत आहे. पण त्यासोबतच त्यांचे विचारही तुमच्यासमोर मांडत आहे. त्यांच्याकडून आपण काय शिकावे हे लेखाच्या शेवटी वाचायला विसरू नका.

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती.

शिवाजी महाराजांचे बालपण

१९ फेब्रुवरी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर एका महान प्रशासकाचा, जनतेच्या जाणत्या राजाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून या राजाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. जिजाऊचा लाडका शिवबा लहानपणी मातीचे किल्ले बांधण्यात रमायचा,तर बाळ मित्रांसमवेत लुटुपुटूच्या लढाया करायचा,कधी सह्याद्रीच्या कडेकपार्यांतून भविष्याचा वेध घ्यायचा आणि रात्री झोपताना जिजाऊ माँ साहेबांच्या कुशीत रामकृष्णाच्या पराक्रमाने प्रेरित व्हायचा. ‘जिजाऊ माँँ साहेब’ म्हणजेच शहाजी महाराजांसारख्या पराक्रमी विराची पत्नी व लखुजी जाधवांसारख्या शूर सरदाराची कन्या.

       आदिलशहा कडून मिळालेल्या पुणे या जहांगीरीची व्यवस्था शहाजी राज्यांनी जिजाबाईंवर सोपवली.त्यावेळी अत्याचाराच्या खाईत पुणे होरपळून गेले होते.शेतकऱ्याला स्वतःच्या कष्टाचे खाणे देखील अवघड झाले होते. मुलीबाळींवरील अत्याचार हृदय पिळवटून टाकणारे होते.वतनदार मग्रूर झाले होते.अशा परिस्थितीत जिजाबाई रामराज्याचं स्वप्न पाहत होत्या.त्यांना स्वराज्याचं सुराज्य बनवणारा शासक घडवायचा होता.जो रयतेला सुख देऊ शकेल.आणि ज्याच्या प्रशासनात जनता सुखी समाधानाचे जीवन जगू शकेल.हे स्वप्न समोर ठेवून त्या हळूहळू शिवबाला घडवू लागल्या.त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी दादोजी कोंडदेवांसारख्या अनुभवी गुरूंवर सोपवली.

शिवबाचे शिक्षण

जिजाबाई आणि दादोजी कोंडदेवांच्या तालमीत शिवबा घडू लागला.शिवबाला बालसंवगडीही त्याच्यासारखेच लाभले.शिवबाचे सर्वांगाने शिक्षण सुरू झाले.

वेद-वेदांताचे,संस्कृतचे धडे शिवबा गिरवू लागला.राजकारणाचे डावपेच शिकू लागला.शास्त्रविद्या अवगत करू लागला.माणसं कशी ओळखायची याचे आकलन शिवबाला होऊ लागले.जिजाबाईंबरोबर न्यायनिवाडे ऐकू लागला.परिस्थितीची जाण शिवबाला येऊ लागली.आणि जे स्वप्न जिजाऊ माँ साहेबांनी पाहिले होते ते आता शिवबाच्या डोळ्यांतही दिसू लागले.मावळ प्रांतात हिंडताना शिवबा आपल्या संवागड्यांसमोर स्वराज्याची कल्पना मांडू लागला.त्यांनाही शिवबाचे विचार पटू लागले.बघता बघता मावळ प्रांतात त्याने सैन्याची बांधाबांध सुरू केली.

शिवाजी महाराजांची स्वराज्याची घोडदौड

स्वराज्याच्या हेतूने प्रेरित होऊन रायरेश्वराच्या मंदिरात सवंगड्यांसमवेत अवघ्या सोळाव्या वर्षी रक्ताभिषेकाने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवबाने घेतली.आणि स्वराज्याच्या वाटचालीला सुरुवात केली. केवढी ती पोरवयातली धमक,केवढा तो आत्मविश्वास आणि केवढी ती जिद्द.

      केवळ 60 सवंगड्यांसमवेत तोरणा किल्ला जिंकुन शिवबाने स्वराज्याचा पाया रचला.किल्ल्याची डागडुजी करताना चार सोन्याच्या घागरींच्या रुपात आईभवानीचा आशीर्वादही शिवबाला लाभला.

      हळूहळू शिवबाचे सैन्य वाढू लागले.आणि आदिलशाहीतील एक एक किल्ला शिवराय आपल्या स्वराज्यास जोडू लागले.स्वराज्याची सीमा दिवसेंदिवस वाढत होती.दिल्लीच्या तख्ताविरुद्ध उभारलेला तो यज्ञ होता. आदिलशहाला हे कळताच त्याने शिवरायांच्या स्वप्नांचे पंख छाटायचे ठरवले.

शिवाजी महाराज आणि अफजलखान

औरंगजेबाने शिवरायांना गिरफ्तार करण्यासाठी दरबार भरवला.दरबारात शिवरायांना शह देण्यासाठी कोणीही तयार होईना.त्या वेळी बडीबेगम साहेबा कडाडली.

       “क्या उस गद्दारे दख्खन से सिवा नाम का लोहा लाने के लिये एक भी मर्द नही है,इस दरबार मे? लालत है ऐसी मर्दनगी पे!”

त्यावेळी दरबारातल्या पोलादी पुरुषाने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला.या पोलादी पुरुषाचे नाव होते अफजल खान.तो एक महाकाय राक्षसच होता जणू. 

स्वतःचे सैन्य घेऊन वाटेतील गावे बेचिराख करत तो दक्षिणेत उतरला.शिवरायांसमोर अफजलखानाला शह देणं हा मोठा पेचच होता.

सह्याद्रीच्या कुशीतच आपण अफजलखानाला उत्तर देऊ शकतो हे शिवरायांनी हेरले होते.त्याची ताकद पहाता त्यांनी अफज़लखानासोबत पत्रव्यवहार सुरू केला.आणि त्याला प्रतापगडावर येण्यासाठी प्रेरित केले. अफजलखान आणि महाराज्यांच्या भेटीचा दिवस ठरला.मोठे काळजीचे वातावरण होते.जेव्हा शामियान्यात शिवरायांनी प्रवेश केला.तेव्हा तो पोलादी पुरुष हात पसरवून आलींगण देण्यासाठी पुढे आला.

जेव्हा शिवाजी राज्यांनी त्यास आलींगण दिले तेव्हा खानाने आपल्या बगलेत शिवरायांची मान दाबण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पाठीवरही वार केला.शिवरायांनी वाघनखांचा वापर करत अफजलखानाचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला.त्यावेळी सय्यद बंडानेही शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण जीवा होता म्हणून शिवा वाचला.

शिवाजी महाराजांचे स्त्रियांबद्दलचे विचार

          शिवरायांकडे शक्ती तर होतीच पण अफाट बुद्धिमत्ता होती.शिवरायांचं गनिमीकावा हे शस्त्र होतं.त्यांनतर त्यांनी लालमहालात घुसून शाहिस्तेखानाची तीन बोटेही तोडली.

त्यावेळी शत्रूच्या पक्षातील स्त्रियांना त्यांनी त्रास होऊ दिला नाही.त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार उदात्त होते.

शहाजी राजे जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांनी जिजाऊ माँ साहेबांना सती जाऊ दिले नाही.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी आईचा मान दिला.हिरकणीची कथा तर सर्वांना माहीतच आहे.आईच्या ममतेला आणि क्षमतेला बुरुज बांधून त्यांनी सलामी दिली. एवढेच कशाला सोळा वर्षांचे असताना,रांझ्याच्या पाटलाने एका परस्त्री सोबत व्यभिचार केला तेव्हा त्याचे हात पाय तोडण्याची शिक्षा महाराजांनी दिली होती.

       मित्रांनो!आजची परिस्थिती पाहता स्त्रियांकडे बघण्याची शिवरायांची दृष्टी आपल्याला लाभली तर स्त्रियांवरील अत्याचार नक्कीच नाहीसे होतील.आणि तोच शिवरायांना केलेला मनाचा मुजरा ठरेल.

शिवाजी महाराज पन्हाळ्याहून विशाळगडाकडे

        शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावर होते तेव्हा सिद्धी जौहर सारख्या विषारी सापाने पन्हाळ्याला वेढा घातला होता.पावसाचे दिवस आणि वेढा सैल झालेला पाहून महाराजांनी काळोख्या रात्री विशाळगडाकडे कूच केले.सिद्धीला खबर लागताच त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला .घोडखिंडीजवळ बाजीप्रभूने शत्रूला झुंजत ठेवले.आणि महाराजांना विशाळगडाकडे पाठवले.जेव्हा तोफांचा आवाज होईल, तेव्हा राजे गडावर सुखरूप पोहोचले असे मी समजेन, असेही बाजीने सांगितले. शत्रूशी दोन हात करता करता बाजीप्रभुंच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.महाराज गडावर पोहोचले हे समजताच,त्या देहाने मृत्यूला कवटाळले.शिवरायांचा जीवाला जीव देणारा एक जीवलग हरपला.पुढे घोडखिंड बाजीप्रभुच्या रक्ताने पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाली.

शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांमधील पुरंदरचा तह

         मित्रांनो!  1665 मध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा दूत मिर्झाराजे जयसिंग यांमध्ये ‘पुरंदरचा तह’ झाला.त्या निमित्ताने शिवाजी महाराज आग्र्याला गेले.त्यावेळी औरंगजेबाने महाराजांना कैद केले.महाराजांसोबत बाळ शंभुराजेही होते.जवळ जवळ तीन महिने महाराज कैदेत होते.जेव्हा शक्तीची पूर्ण आशा संपली तेव्हा पुन्हा महाराजांनी युक्तीचा वापर करायचे ठरवले.आजारी पडण्याचे सोंग घेऊन राजांनी मिठाई वाटायला सुरुवात केली.काही दिवसांनी मिठाईच्या पेठरयातूनच महाराज पसार झाले.त्यानंतर ते महाराष्ट्रात कोणत्या मार्गाने आले हे आजतागायत कोणालाही कळलेले नाही.यातूनच आपल्याला कळते की त्यांचे नियोजन किती बारकाईचे आणि सुव्यवस्थित होते.

        जेव्हा तानाजीच्या कोंढाण्यावरील शौर्याची कथा आपण ऐकतो तेव्हा चारही बाजूने प्रतिकूल परिस्थिती असताना शून्यातून निर्माण केलेले विश्व, विश्वासू साथीदार, जीवाला जीव देणारे मावळे यातून त्यांची माणूस पारखण्याची नजर आणि माणुस जोडण्याची कला आपल्याला दिसून येते.रायबाच्या लग्नासाठी स्वतःहून घेतलेला पुढाकार पाहून ,जमिनीवर पाय असणं म्हणजे काय आणि रयतेवर जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला समजतो.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

         6 जून 1674 हा मंगल दिन उजाडला. ज्या दिवशी अश्वपति, गडपती, भूपती, हयपती आणि जाणत्या राजाने डोक्यावर छत्र धारण केले.रायगडावर मंगल वाद्ये वाजत होती आणि सप्तनद्यांच्या जलाशयाने गागाभट्टांकरवी शिवरायांवर अभिषेक होत होता.जणू काही हा सोहळा याची देही उची डोळा पाहण्यासाठीच जिजाबाई डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होत्या.त्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होत होतं.त्यांचा शिवबा ,छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गौरविला जात होता. 

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी  शहाजी पुत्र शिवाजी यांची मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान होत होती.

             मित्रांनो! राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करावं तेवढे कमीच. शिवराज्याभिषेकानंतर जिजाबाई अवघ्या 12 दिवसांतच स्वर्गवासी झाल्या.शिवरायांचा मार्गदर्शक त्यांचा आधारच गेला.या दुःखातून सावरून शिवरायांनी दक्षिण मोहीम हाती घेतली.जिंजी काबीज करून कुतूबशहाशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले.औरंगजेबाचे संकट आलेच तर कुतुबशहा आणि मराठा राज्य मिळून शह देऊ शकेल असा त्यांचा विचार होता.केवढी ती दूरदृष्टी,कौतुक करावे तेवढे कमीच.अहोरात्र मेहनत,रयतेसाठीची तळमळ, लढाया यातून शिवरायांना  विश्रामसाठी वेळ काय तो कमीच मिळाला.इच्छाशक्ती तरुण असली तरी शरीर थकले होते.आजारानेही ग्रासले होते.शिवरायांना गुढग्याचा त्रास होता असाही उल्लेख आढळतो.आणि अखेर हिंदवी स्वराज्याच्या राजाची प्राणज्योत 3 एप्रिल 1680 साली मालवली.अवघ्या 50व्या वर्षी रयतेचा जाणता राजा रयतेला पोरकं करून स्वर्गवासी झाला.यावेळीं नमाज पढताना औरंगजेबाने काढलेले उद्गार असे होते की 

        ” या अल्लाह! दुष्मन दिया भी तो कौन दिया? ‘सिवा भोसला’ जैसा दिया! अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा,क्योंकि दुनिया का सबसे बहादूर योद्धा तेरे पास आ रहा है!”

     एक राजा ज्याच्या कीर्तीचा डंका संपुर्ण जगात गाजतोय,असा प्रशासक कधी झाला नव्हता आणि आता पुन्हा होणे नाही.आपले भाग्य थोर म्हणून असा राजा आपल्या मातीत जन्माला आला.


शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकावे?

शिवरायांचं कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥

शिवरायचे सलगी देणें । कैसे असें

सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥

राज्यसाधनाची लगबग । कैसी केली 

त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥

या उपरी विशेष । काय लिहावें

असे रामदास स्वामी लिहितात,

शिवरायांची दूरदृष्टी आपल्या लक्षात आलीच असेल,ते सरदारांना सल्ला द्यायचे की दिव्यातली वात विझवूनच झोपा नाहीतरी उंदीर घेऊन जातील आणि त्यामुळे आग लागण्याची सुद्धा संभावना आहे, यातून ते किती बारीक लक्ष ठेवायचे हे आपल्याला कळतं.

वेश बदलून शिवाजी महाराज राज्यात फेरफटका मारायचे,जनतेची सुखदुःख ,यातना समजून घ्यायचे.आताचे सरपंच किंवा नगरसेवक सुद्धा गाव पालथा घालत असतील की नाही याबद्दल शंकाच आहे.

महाराज कोणतीही योजना राबवायचे तेव्हा इतकं व्यवस्थित नियोजन करायचे, की तळागाळातल्या सामान्य जनतेला त्याचा लाभ होतोय की नाही यावर त्यांचं नीट लक्ष असायचं.

शेती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना असतील किंवा वण्याविभाग राक्षणासाठीची त्यांची तळमळ असेल.महाराज प्रत्येक गोष्टीत जीव ओतून काम करायचे.

सुरत लूट करताना काळा पैसा कसा बाहेर काढायचाय याची टेक्निक त्यांना अवगत होती.

शिवरायांना father of nevy म्हणून संबोधलं जातं,त्यांच्या आरमाराचा अभ्यास बाहेरच्या देशांतही केला जातोय.ही खरच खूप अभिमानाची बाब आहे.

त्यांच्या सैन्यातील शिस्त,सारं काही सर्मपन करून लढायची वृत्ती,शत्रूच्या भागातील बायकामुलांना त्रास न देता, शेतीचं नुकसान न करता ,भल्या मोठ्या सैन्या समोर हिंमतीनं उभं राहण्याची ताकद,आणि सैन्याचं मनोबळ वाढवण्याची कला महाराज्यांना अवगत होती.

महाराज्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं, हीच त्यांच्या राजकारभारातील लोकशाहीची पाळंमुळं होती.त्यांच्या दरबारात प्रत्येकाला समान न्याय होता.मग त्यांची पत्नी असेल,त्यांचा मुलगा असेल किंवा स्वतः महाराज, चुकीच्या कृत्याबद्दल ते रयतेला सामोरे जाण्यास जबाबदार होते.

महाराजांनी कधीच जात धर्मावरून भेदभाव केला नाही.जेवढा मंदिरांना दानधर्म केला तेवढाच मस्जिद दर्ग्यासाठी केला.त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर पहिली मस्जिद बांधली जाईल असा त्यांचा हुकूम असायचा.नेताजी पालकराला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात त्यांना काहीच वावगे वाटले नाही.त्यांनी प्रत्येकाला समान वागणूक आणि हक्क दिले.जे लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शिवाजी राजांचे विचार आपल्या सर्वांत भिनले तर आपण केवळ विकसितच काय महासत्ताक म्हणून उदयास येऊ.

लॉर्ड माउंटबॅटन म्हणालाच होता

“शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय,पण परग्रहावरही राज्य केले असते.”

मित्रांनो शेवटी एवढंच म्हणावसं वाटतंय

आठवावे ते रूप। आठवावा तो प्रताप।

आठवावा तो साक्षेप। भूमंडळी

 मित्रांनो! केवळ शिवरायांच्या फोटोला नमस्कार करून काहीही होणार नाही.त्यांचा एकेक विचार आपल्या मध्ये रुजवायला हवा तेव्हाच शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येण्याची आवश्यकता नाही.

प्रत्येकजण शिवाजी होईल.

Something Wrong Please Contact to Davsy Admin

Leave a Reply