You are currently viewing प्रयोग :- कर्तरी , कर्मणी, भावे प्रयोग

प्रयोग :- कर्तरी , कर्मणी, भावे प्रयोग

कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात. कर्तरिप्रयोग, कर्मणिप्रयोग व भावेप्रयोग असे प्रयोगाचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

कर्तरी प्रयोग

कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरिप्रयोग होतो. उदाहरणार्थ

तो पुस्तक वाचतो. (कर्ता- तो. क्रियापद – वाचतो. कर्म- पुस्तक.)

या वाक्यात ‘तो’ या पुंलिंगी कर्त्याऐवजी ‘ती’ हा स्त्रीलिंगी कर्ता घातल्यास क्रियापदाचे रूप ‘वाचते’ असे होईल. तसेच ‘तो’ या एकवचनी कत्याएवजी ‘ते’ हा अनेकवचनी कर्ता घातल्यास क्रियापदाचे रूप ‘वाचतात’ असे होईल.

त्याचप्रमाणे ‘तो’ या तृतीय पुरुषी कर्त्याऐवजी ‘तुम्ही’ हा द्वितीय पुरुषी कर्ता घातल्यास क्रियापदाचे रूप ‘वाचता’ असे होईल. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत. सकर्मक कर्तरिप्रयोग व अकर्मक कर्तरी प्रयोग.

सकर्मक कर्तरी प्रयोग :- ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक असते, तो ‘सकर्मक’ कर्तरी प्रयोग असतो.

उदाहरणार्थ

 1. तो मुलगा पेरू खातो. (कर्ता- तो मुलगा क्रियापद खातो. कर्म- पेरू.)
 2. ती मुलगी पेरू खाते. (कर्ता- ती मुलगी. क्रियापद खाते. कर्म- पेरू.)

अकर्मक कर्तरिप्रयोग :- ज्या कर्तरप्रयोगातील क्रियापद हे अकर्मक असते, तो ‘अकर्मक कर्तरिप्रयोग असतो. उदाहरणार्थ

 1. तो हसतो. (कर्ता- तो, क्रियापद- हसतो.) 
 2. पोपट उडाला. (कर्ता- पोपट, क्रियापद- उडाला.)

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतो. कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. उदाहरणार्थ

 1. मी कामावरून आताच आले. (प्रथमान्त कर्ता)
 2. पोपट पेरू खातो. (प्रथमान्त कर्म) 
 3. शिक्षक मुलांना शिकवितात. (द्वितीयान्त कर्म)

कर्मणी प्रयोग

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलते. उदाहरणार्थ

निखिलने आंबा खाल्ला. (कर्ता- निखिलने, क्रियापद- खाल्ला, कर्म- आंबा.) आता ‘आंबा’ या पुलिंगी कमरिवजी ‘चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घातल्यास क्रियापदाचे रूप ‘खाल्ली’ असे होईल.

तसेच ‘आंबा’ या एकवचनी कमशिवजी ‘आंबे’ हे अनेकवचनी कर्म घातल्यास रूप ‘खाल्ले’ असे होईल. 

कर्मणी प्रयोगाची लक्षणे

1) कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीत किंवा सविकरणी तृतीयान्त वादयोगी अव्ययान्त असून कर्म प्रथमा विभक्तीत असते. उदाहरणार्थ :-

 1. त्याने गाणे म्हटले. (तृतीयान्त कर्ता, प्रथमान्त कर्म)
 2. मला ही टेकडी चढवते. (चतुर्थ्यान्त कर्ता)
 3. सखारामच्याने काम करवते. (कर्ता सविकरणी तृतीयान्त)
 4. सिंहाकडून गाय मारली गेली. (कर्ता शब्दयोगी अव्ययान्त) 

2) कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते म्हणजेच कर्म हा धातुरूपेश असतो.

3) कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार नसतात; कारण कर्म असल्याशिवाय हा प्रयोग होणार नाही. या प्रयोगात क्रियापद सकर्मकच हवे.

भावे प्रयोग

भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते. भावेप्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्यास प्राधान्य असते. त्यामानाने मूळ कर्ता व मूळ कर्म ही दोन्ही गौण असतात. 

उदाहरणार्थ

 1. मुलाने कुत्र्याला मारले, 
 2. मुलीने गायीला मारले. 
 3. मुलांनी कुत्र्यांना मारले. 

या ठिकाणी कर्त्याच्या व कर्माच्या लिंग, वचन व पुरुषात बदल झाला तरी त्याचा क्रियापदावर काहीही परिणाम न होता ते कायम तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी राहिले आहे. भावेप्रयोगाचे सकर्मक भावेप्रयोग व अकर्मक भावेप्रयोग असे दोन प्रकार आहेत.

सकर्मक भावेप्रयोग :- ज्या भावेप्रयोगात क्रियापद सकर्मक असते त्या भावेप्रयोगास ‘सकर्मक भावेप्रयोग म्हणतात. 

उदाहरणार्थ

 1. रामाने रावणाला मारले.
 2. आईने मुलीस समजावले.

अकर्मक भावेप्रयोग :- ज्या भावेप्रयोगातील वाक्यात कर्म नसते त्यास ‘अकर्मक भावेप्रयोग’ असे म्हणतात. 

उदाहरणार्थ

 1. त्याने व्यवस्थित वागावे.
 2. सर्वांनी उभे राहावे.
 3. त्याला खवखवते.
 4. तिला मळमळते.

भावेप्रयोगाची लक्षणे

 1. कर्ता तृतीयान्त किंवा चतुर्थ्यान्त असतो.
 2. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी विभक्ती असते.
 3. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थीच असते. 
 4. शक्यार्थक अकर्मक क्रियापदांचा नेहमीच भावेप्रयोग होतो.
 5. क्रियापद नेहमी नपुंसकलिंगी तृतीयपुरुषी एकवचनी असते.

Leave a Reply