You are currently viewing भगवद्गीता अध्याय अठरावा (भाग 1)

भगवद्गीता अध्याय अठरावा (भाग 1)

अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन।।१८-१।।
श्रीभगवानुवाच
काम्यानां कर्माणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ।।१८- २ ।।

अर्जुन म्हणाला, हे महाबाहो! हे हृषीकेशा! केशिनिषूदना! मी संन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. या अठराव्या व शेवटच्या अध्यायात भगवंतांनी सर्व गीतेचे सार सांगितले आहे. म्हणून या अध्यायाला एकाध्यायी गीता असेही म्हटले जाते. संन्यास व त्याग हे दोन विषय स्वतंत्रपणे समजावून घ्यावेत म्हणून अर्जुनाने संन्यास व त्याग समजावून सांगण्याची विनंती केली. तेव्हा भगवंत म्हणाले की. काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास होय, असे कित्येक विद्वान लोक मान्य करतात आणि सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणे याला त्याग, असे मान्य करतात. सकाम यज्ञाचा त्याग केला पाहिजे.

त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ।।१८-३।।
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ।।१८-४।।

कित्येक विद्वान असे म्हणतात की, सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की, यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही. हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना! संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक, कारण त्याग सात्त्विक, राजस व तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला गेला आहे.

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ।।१८-५।।
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्।।१८-६।।

यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे; कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे पार्था! ही यज्ञ, दान व तप रूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे.

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ।।१८-७।।
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्।।१८-८।।

निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे; परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही.

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ।। १८-९।। न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ।।१८-१०।।

हे अर्जुना! जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्त्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मांत आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय.

न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ।।१८-११ ।।
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ।। १८-१२ । ।

कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे, असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते; परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही.

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।१८-१३।।
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्वेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्॥१८-१४।।

हे महाबाहो अर्जुना! सर्व कर्माच्या सिद्धींची ही पाच कारणे, कमा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत, ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.

शरीरवामनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ।।१८-१५।।
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ।।१८-१६।।

मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही पाचही कारणे असतात; परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही.

यस्य नाहकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते।
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ।।१८-१७।।
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ।।१८-१८।।

ज्या माणसाच्या अंतःकरणात मी कर्ता आहे, असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांत आणि कर्मांत लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.

ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छृणु तान्यपि।।१८-१९।।
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते।
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ।। १८-२० ।।

गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन-तीन प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे, असे पाहतो, ते ज्ञान तू सात्त्विक आहे, असे जाण.

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्।।१८-२१।।
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्।।१८-२२।।

परंतु, ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण; परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे.

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ।।१८-२३।।
यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ।।१८- २४।।

जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्त्विक म्हटले जाते; परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले गेले आहे.

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ।।१८-२५।।
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ।।१८-२६।।

जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते. जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, मी, माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्य सिद्ध होवो वा न होवो, त्याविषयी हर्ष, शोकादी विकारांनी रहित असलेला असतो, तो सात्त्विक म्हटला जातो.

Leave a Reply