You are currently viewing मराठीतील महत्वाच्या म्हणी

मराठीतील महत्वाच्या म्हणी

(१) अडला हरी गाढवाचे पाय धरी : अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करण्याची पाळी येते.

(२) अळी मिळी गुप चिळी : आपले रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून गप्प बसणे.

(३) अन्नसत्री जेवून मिरपूड मागणे: अगोदरच एखादे काम फुकट करवून घेणे; नंतर उपकाराची जाणीव न ठेवता आणखी मिजासखोरी करणे.

(४) अति तेथे माती : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. 

(५) अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी? : चूक स्वतःच करून ती मान्य तर करावयाची नाही; उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हावयाचे.

(६) अडली गाय फटके खाय: एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते.

(७) असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा : अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपास करण्याची पाळी येणे.

(८) आधीच तारे आणि त्यात शिरले वारे: आधीच मर्कट आणि त्यात त्याने मद्यपान करावे तसे होणे. 

(९) असंगाशी संग प्राणाशी गाठ : दुर्जनाशी संगत केल्यास वेळप्रसंगी आपलेच प्राण गमाविण्याची वेळ येते. 

(१०) अचाट खाणे मसणात जाणे : खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.

(११) अर्थीदान महापुण्य : गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते. दान नेहमी सत्पात्री करावे. 

(१२) अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही : सौम्यपणाने वागून वा उपकृत करून दुसऱ्या माणसाला नमविता येते, तर उद्धटपणाने, कठोर वागण्याने तो माणूस आपला शत्रू बनतो.

(१३) अर्धी टाकून सगळीला धावू नये: एखादी वस्तू संपूर्ण मिळावी म्हणून जवळ असणारी अर्धी टाकून देऊ नये. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये. 

(१४) अति शहाणा त्याचा बैल रिकामा : स्वतःला अति शहाणा समजणाऱ्याकडून प्रत्यक्षात कोणतीही सुयोग्य अथवा खरेखुरे शहाणपण दर्शविणारी कृती घडून येत नाही.

(१५) असतील शिते तर जमतील भुते: एखाद्याकडे काही पैसा अडका, धन-दौलत असेल तर (त्याच्यापासून काही फायदा होईल या अपेक्षेने) त्याच्याभोवती चार माणसे जमतात.

(१६) आयत्या बिळात नागोबा : दुसऱ्या माणसाने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा

(१७) आपला हात जगन्नाथ: आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. दुसरा अर्थ- आपल्याच हाताने एखादी गोष्ट भरपूर घेत राहणे.

(१८) आईजीच्या जिवावर बाईजी उदार : दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे. 

(१९) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार : जे मुळातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 

(२०) आकारे रंगती चेष्टा : बाह्य लक्षणांवरून अंतर्गत वागणुकीचे (स्वभाव-गुणधर्म) चित्र स्पष्ट होते.

(२१) आगीतून उठून फुफाट्यात पडणे: एका मोठ्या संकटातून बाहेर पडून दुस मोठ्या संकटात सापडणे.

(२२) आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी : गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्या माणसाला मदत करणे; डोळ्यात केर आणि कानात फुंकर अशातला प्रकार.

(२३) आवळा देऊन कोहळा काढणे : आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. दुसऱ्यासाठी थोडेसे काहीतरी करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे.

(२४) आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी : आधी आचरण बिघडते नंतर वाईट दशा प्राप्त होते. बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाची नीती बिघडते, आचरण बिघडते. परिणामी, वित्तनाश होतो व तो दुर्दशेप्रत पोहोचतो.

मराठी व्याकरण :- म्हणी

(२५) आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटे : स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. जे आपले आहे ते चांगले, दुसऱ्याचे ते वाईट अशी प्रवृत्ती.

(२६) आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला : ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या ठिकाणी असणे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशातला प्रकार. 

(२७) आपली पाठ आपणास दिसत नाही : स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. 

(२८) आजा मेला नातू झाला : एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे.

(२९) आपल्याच पोळीवर तूप ओढणे : फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

(३०) आलीया भोगासी असावे सादर : तक्रार वा कुरबूर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

(३१) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास : मुळातच आळशी असलेल्या व्यक्त त्याच्या आळशीपणास अनुकूल वा पोषक अशी परिस्थिती निर्माण होणे.

(३२) आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे: एका इच्छित गोष्टीबरोबर अनपेक्षितपणे दुसरी एखादी गोष्ट मिळणे, अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे.

(३३) आंधळे दळते कुत्रे पीठ खाते: एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. सगळाच सावळा गोंधळ! 

(३४) आंधळ्या बहिऱ्याची गाठ : एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे.

(३५) आत्याबाईला जर मिशा असत्या तर : नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे, काल्पनिक गोष्टी गृहीत धरून त्याआधारे पुढील विचार करणे.

(३६) आधी पोटोबा मग विठोबा : आधी स्वार्थ मग परमार्थ.

(३७) आपलेच दात, आपलेच ओठ : आपल्याच माणसांनी केलेल्या चुका लोकात स्पष्ट करून दाखवता येत नाहीत.

(३८) इकडे आड तिकडे विहीर : दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती असणे.

(३९) उचलली जीभ लावली टाळ्याला : विचार न करता बोलणे. 

(४०) उथळ पाण्याला खळखळाट : फार थोडेसे गुण अंगी असणाऱ्या माणसाला अतिशय गर्व असतो. ज्यांच्या अंगी बेताचीच विद्वत्ता असते अगर बेताचाच पैसा जवळ असतो तेच त्याचे अधिक प्रदर्शन करतात. Empty vessels make the most sound.

(४१) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग : प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखविणे..

(४२) उडत्या पाखराची पिसे मोजणे : अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. 

(४३) उठता लाथ बसता बुक्की : एकसारखा नेहमी मार देणे. एखाद्याच्या प्रत्येक कृतीबद्दल काहीना काही निमित्त काढून त्याला शिक्षा देत राहणे.

(४४) ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये : कोणत्याही गोष्टींचा गैरफायदा घेऊ नये.

(४५) उंदराला मांजर साक्षी : सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे.

(४६) एक ना धड भाराभार चिंध्या : सगळेच अपूर्ण एकही काम पुरे न करता अनेक कामे हाती घेणे व परिणामी सगळीच कामे अपुरी राहणे.

(४७) एका माळेचे मणी : सगळेच सारखे. 

(४८) एका हाताने टाळी वाजत नाही : दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो.

(४९) एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. : दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत. दोन सवती एका घरात सुखा-समाधानाने राहू शकत नाहीत.

(५०) एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवून पाहतो विडी: दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता, त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. 

महत्वाच्या म्हणी

(५१) एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये : दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. दुसऱ्याने केलेल्या वाईट कृतीमुळे आपण केलेली वाईट कृती समर्थनीय

(५२) ऐकावे जनाचे करावे मनाचे : लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य

(५३) ओळखीचा चोर जिवे न सोडी : ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. (तुम्ही त्याला ओळखाल म्हणून ओळखीचा चोर त्याच्या अपकृत्यास साक्षीदार शिल्लक राहू नये म्हणून तुम्हाला जिवंत सोडणार नाही. एवम, वाईट व्यक्तीशी असलेल्या ओळखीपासून फायदा न होता, तोटाच होतो.

(५४) अंथरूण पाहून पाय पसरावे : आपली ऐपत व वकूब पाहून वागावे. जे शक्य आहे तेवढेच करावे.

(५५)अंगापेक्षा बोंगा मोठा : वस्तुस्थितीपेक्षा तिचे अवडंबरच मोठे. मिशा वीतभर दाढी हातभर किंवा एक हात लाकूड दहा हात ढपली, असा प्रकार. 

(५६) कणगीत दाणा तर भील उताणा: गरजेपुरते जवळ असले की काही लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.

(५७) करावे तसे भरावे : जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले-वाईट फळ भोगावे लागणे.

(५८) कर नाही त्याला डर कशाला: ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे?

(५९) कडू कारले तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच माणसाचा मूळ स्वभाव कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही. नळीत घातले तरी शेपूट वाकडे ते वाकडेच.

(६०) करीन ती पूर्व : मी करीन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. 

(६१) करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल का : मुळातच लहान असलेली गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी एका मर्यादिपेक्षा मोठी होऊ शकत नाही. मुळातच बेताचाच वकूब असलेली व्यक्ती किती मोठी होऊ शकेल, यालाही काही मर्यादा असते. बेडकी फुगली तरी बैलाएवढी मोठी होऊ शकत नाही. 

(६२) कधी गाडीवर नाव कधी नावेवर गाडी : सर्वांचेच दिवस येतात. समान स्थिती कधीच राहत नाही. सर्वसामान्य गरीब माणसे नमतात.

(६४) कधी तुपाशी तर कधी उपाशी : सांसारिक स्थिती सदा सारखीच राहत नाही. कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था प्राप्त होते. 

(६५) काळ आला होता, पण वेळ आली नव्हती : नाश होण्याची वेळ आली होती. पण थोडक्यात बचावले.

(६६) काखेत कळसा गावाला वळसा : आपल्याला हवी असलेली वस्तु आपल्याजवळच असताना तिच्या प्राप्तीसाठी धावाधाव करणे.

(६७) कानामागून आली आणि तिखट झाली : मागून येऊन वरचढ होणे.

(६८) काप गेले नि भोके राहिली: वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या.

(६९) कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत : क्षुद्र माणसांच्या हीन वाणीने थोरांच्या कार्यावर काहीही दुष्परिणाम होत नाही. गोड बोलणे. ताकापुरते

(७०) कामापुरता मामा : आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी आजीबाई म्हणणे.

(७१) कावळा बसायला अन् फांदी तुटायला बोलाफुलाची गाठ पडणे. 

(७२) काकडीची चोरी फाशीची शिक्षा : अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.

(७३) काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही : जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. 

(७४) काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही : खरी मैत्री किरकोळ कारणांनी भंग होऊ शकत नाही. रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. 

(७५) काडी चोर तो माडी चोर: एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. 

मराठी व्याकरण

(७६) काट्याचा नायटा करणे : एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे, राईचा पर्वत करणे, पराचा कावळा करणे.

(७७) कुठे जाशी भोगा तो तर तुझ्यापुढे उभा : जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते तेच संकट समोर येऊन उभे राहते.

(७८) कुसंतानापेक्षा निसंतान बरे: दुर्वर्तनी अपत्यांपेक्षा अपत्ये नसणे बरे.

(७९) कुन्हाडीचा दांडा गोतास काळ : आपलाच मनुष्य आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो.

(८०) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच : अविचारी व माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी काही माणसाच्या स्वभावातील दोष दूर होत नाहीत.

(८१) कुडी तशी पुडी : देहाप्रमाणे आहार.

(८२) कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा : दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

(८३) कुंपणाने शेत खाणे : ज्याला रक्षण करावयास ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करून चोरी करणे.

(८४) कोरड्याबरोबर ओले जळते : ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक असणाऱ्यांबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो. 

(८५) कोळसा जितका उगाळावा तितका काळाच : मुळात वाईट असणाऱ्या गोष्टीवर कितीही चर्चा केली अथवा तिचा कितीही ऊहापोह केला तरी ती वाईटच 

(८६) कोल्हा काकडीला राजी: क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूष होतात.  

(८७) केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.

(८८) खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते : खर्च करणाऱ्याचा खर्च होतो; तो त्याला मान्यही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकूर करतो.

(८९) खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे: बोलताना एक बोलावयाचे आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करावयाची.

(९०) खाण तशी माती : आईवडिलांप्रमाणेच त्यांची मुले. 

(९१) खायला काळ भुईला भार : निरुपयोगी मनुष्य.

(९२) खाऊन माजावे टाकून माजू नये: पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. 

(९३) खोट्याच्या कपाळी गोटा : खोटे अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसानच होते. त्याच्या कर्माचे फळ त्यास भोगावेच लागते. 

(९४) खाऊ जाणे तो पचवू जाणे : एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. 

(९५) खाई त्याला खवखवे : वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखे डाचत असते. चोराच्या मनात चांदणे.

(९६) गरजवंताला अक्कल नसते : गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घेणे भाग पडते. 

(९७)गर्जेल तो पडेल काय? : मोठमोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करीलच अथवा त्याची तितकी योग्यता असेलच असे नाही.

(९८) खऱ्याला मरण नाही : खरे कधी लपत नाही. सत्यमेव जयते

(९९) गर्वाचे घर खाली : गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. 

(१००) गरज सरो नि वैद्य मरो: आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे

महत्वाच्या म्हणी 

(१०१) गाड्याबरोबर नळ्याची यात्रा : मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो.

(१०२) गाढवाला गुळाची चव काय : ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टी महत्त्व कळू शकत नाही. ज्याची लायकी नाही, त्याला त्याच्या लायकीपेक्षा मोठय गोष्टीचे महत्त्व समजू शकत नाही. माकडाला हिऱ्याचे महत्त्व समजू शकेल काय?

(१०३) गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी : एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही; तर तिचा फायदा घेता यायला हवा अथवा तिचा फायदा घेण्याची क्षमता असायला हवी, तरच त्या अनुकूलतेचा उपयोग!

(१०४) गावंढ्या गावात गाढवीण सवाशीण : जेथे चांगल्याचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. वासरात लंगडी गाय शहाणी ठरते. 

(१०५) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता : मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो.

(१०६) गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली : एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ठीक. समजा ती गोष्ट नाही झाली तरी नुकसान होत नाही. तिचा दुसरा उपयोग करून घेता येतो.

(१०७) गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य : अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते.

(१०८) गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ मूर्ख लोक एका ठिकाणी जमले तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही.

(१०९) गाव करी ते राव न करी : श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. जे करू शकणार नाही,

(११०) गुरूची विद्या गुरूला फळली : एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे. एखाद्याकडून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवून व त्या ज्ञानाचा वापर करून त्यासच नामोहरम करणे.

(१११) गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी गरिबीमुळे आपण दुसऱ्यासाठी काही करू शकलो नाही, तरी हरकत नाही; परंतु आपले बोलणे तरी गोड असावे, वृत्ती तरी विनम्र असावी.

(११२) गोगलगाय अन् पोटात पाय : बाह्य स्वरूप एक आणि कृती दुसरीच. बाहेरून गरीब व निरुपद्रवी दिसणारी, परंतु मनात कपटवृत्ती असणारी व्यक्ती. 

(११३) गोरा गोमटा आणि कपाळ करंटा : फक्त दिखावट चांगली असणे, प्रत्यक्षात खडतर नशिबाचा असणे. रूपाने सुंदर परंतु दुर्दैवी.

(११४) घर ना दार देवळी बिहऱ्हाड बायकापोरे नसणारा एकटा मनुष्य. होटल में खाना. मस्जिद में सोना। असे जीवन जगतो.

(११५) घरोघर मातीच्याच चुली : सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

(११६) घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात वाईट दिवस एकदा आले की मग आपले म्हणणारे लोकसुद्धा मदत करत नाहीत. 

(११७) घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे : स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे.

(११८) घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते : वेगवेगळ्या माणसांना आपापल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते.

(११९) चढेल तो पडेल : गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. 

(१२०) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे : प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा महत्त्व प्राप्त होतेच. सर्व दिवस सारखेच नसतात. 

(१२१) चिंती परा ते येई घरा: दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते.

(१२२) चालत्या गाडीला खीळ : व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण होणे.

(१२३) चोराच्या मनात चांदणे : अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघडकीस येईल की काय, याची सतत भीती असते.

(१२४) चोर सोडून संन्याशी: खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न करता निरपराध माणसाला शिक्षा करणे.

(१२५) चोराच्या हातची लंगोटी : ज्याच्याकडून काहीही मिळण्याची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे का होईना प्राप्त होणे म्हणजे विशेषच!

शब्दसमृद्धी – मराठी म्हणी

(१२६) चोराची पावले चोरालाच ठाऊक : वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. एखाद्या क्षेत्रातील खाचाखोचा त्याच क्षेत्रातील व्यक्तीस ठाऊक असतात.

(१२७) चोराच्या उलट्या बोंबा : स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे. 

(१२८) जसे करावे तसे भरावे : जशी कृती केली असेल तसे फळ मिळते.

(१२९) जन्मा आला हेला पाणी वाहता मेला : अडाणी माणसाचे आयुष्य काबाडकष्ट करण्यातच व्यतीत होते; परंतु तो काहीही कमवू वा मिळवू शकत नाही.

(१३०) जळात राहून माशाशी वैर : ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशीच शत्रुत्व. 

(१३१) जगी सर्व सुखी असा कोण आहे? : ज्याला सर्व सुखे प्राप्त झाली आहेत, असा या जगात कोणीही नाही. (गंमत म्हणून निर्लज्जम् सदा सुखी, असे सांगता येईल.)

(१३२) जळतं घर भाड्याने कोण घेणार? : नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार? बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक कोण घेणार? 

(१३३) जळत्या घराचा पोळता वासा : घराला लागलेल्या आगीतून काही काढता आले तर काढावे. प्रचंड नुकसानीतून जे काय वाचेल ते आपले म्हणावे व समाधान बाळगावे.

(१३४) जनावराचे जिणे जगणे : अन्याय, त्रास सहन करत आयुष्य व्यतीत करणे. 

(१३५) जशी देणावळ तशी धुणावळ : दाम तसे काम.

(१३६) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे : अनुभव मिळाल्यानेच कोणत्याही गोष्टीची कल्पना येते. तोपर्यंत फक्त दुरून डोंगर साजरे वाटतात.

(१३७) ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी : समान शीलाच्या वा तितक्याच चांगल्या अथवा वाईट व्यक्ती. 

(१३८) ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी : जो कोणी आपल्यावर उपकार करतो, त्या उपकारकर्त्याचे उपकार स्मरून त्याचे गुणगान करणे.

(१३९) ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल : ज्याला दुःख भोगावे लागते त्यालाच त्याची कल्पना असते.

(१४०) ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे : कधी कधी ज्याच्याकरिता आपण काही कल्याणकारक गोष्टी करतो अथवा ज्याला काही हितोपदेश करतो, ती व्यक्तीच स्वतःचे दोष आपल्या माथी मारून त्याचेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करते. 

(१४१) ज्याच्या हाती ससा तो पारधी : एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. जी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकत नाही, पण ती केल्याचे दाखवू शकते तिच्याकडेच ती गोष्ट केल्याचे श्रेय जाते.

(१४२) जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी : मुलांना वळण लावणे, थोर व कर्तबगार बनविणे हे मातेच्या म्हणजेच स्त्रीच्या हातात असते. परिणामी, जगाचा उद्धार करणेही तिच्याच हाती असते. 

(१४३) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही : मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच

(१४४) जी खोड बाळा ती जन्मकाळा : लहानपणी लागलेल्या सवयी जन्मभर टिकतात. 

(१४५) जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी : स्वतःच्याच हट्टाने वागणे. नेसेन तर पैठणीच नेसेन नाही तर… 

(१४६) झाकली मूठ सव्वा लाखाची : आपली उणीव व दुर्गुण झाकून ठेवणे, ते उघड न करणे.

(१४७) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही : श्रम केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही.

(१४८) डोळ्यात केर आणि कानात फुंकर : रोग एक आणि उपचार निराळाच. आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी

(१४९) डोंगर पोखरून उंदीर काढणे : प्रचंड परिश्रम करूनही खूप कमी यश हाती लागणे.

(१५०) ढवळ्याशेजारी बांधला पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट थोडेच फल प्राप्त होणे.चांगल्या माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो.

महत्वाच्या म्हणी

(१५१) तहान लागल्यावर विहीर खणणे: एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावर त्यावर उपाय शोधणे.

(१५२) तळे राखील तो पाणी चाखील : ज्याच्यावर एखादे काम सोपविले त्यातून स्वतःचा थोडा तरी फायदा करून घेतोच. (त्यात वावगे ते काय?)

(१५३) ताकापुरते रामायण किंवा ताकापुरती आजीबाई : काम साधण्यापुरती दुसऱ्याची खुशामत करणे. कामापुरते समोरच्यास मामा म्हणणे व काम करून घेणे.

(१५४) ताकाला जावे आणि भांडे का लपवावे? : कमीपणा वाटणारी एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर ती लपविण्याचा भोंदूपणा करण्यात काय अर्थ आहे? शेजाऱ्याकडून ताक मागून आणावयाचे असेल तर भांडे दडवून कसे चालेल? एक तर कमीपणा वाटणारी गोष्ट टाळा अन् करावीच लागत असेल तर निदान ढोंगीपणा तरी करू नका.

(१५५) तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणे : सर्व साधनसामग्रीची अनुकूलता असताना आपले इष्ट कार्य करून घेणे. वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे.

(१५६) तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले : मूर्खपणामुळे फायद्याच्या दोन्ही गोष्टी जाऊन शेवटी काहीही न मिळणे. 

(१५७) तेरड्याचा रंग तीन दिवस : कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. थोडक्यात म्हणजे नव्याची नवलाई नऊ दिवस! 

(१५८) तोंड धरून बुक्क्यांचा मार : काही कारणाने अन्याय निमूटपणे सहन करण्याची वेळ येते. त्या अन्यायविरुद्ध आवाजही उठवता येत नाही.

(१५९) थेंबे थेंबे तळे साचे : थोडे थोडे साठविल्यास पुढे मोठा संचय (Many drops make a shower.) निर्माण होतो.

(१६०) थोराघरचे श्वान त्याला सर्वही देती मान : मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो. असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.

(१६१) दगडावरील रेघ : पक्का निर्णय. न बदलणारी गोष्ट.

(१६२) दसकी लकडी एकका बोजा : प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.

(१६३) दगडापेक्षा वीट मऊ : मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते. 

(१६४) दात कोरून पोट भरत नाही : मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काहीही उपयोग होत नाही.

(१६५) दाम करी काम बिबी करी सलाम: पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. या म्हणीतून पैशाला असलेले महत्त्व स्पष्ट होते.

(१६६) दाखविलं सोनं हसे मूल तान्हं पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. पैशाची दाखविताच कामे पटकन होतात.

(१६७) दिव्याखाली अंधार : मोठ्या माणसातदेखील दोष असतात.

(१६८) दिल चंगा तो कथौटी में गंगा : आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळच असते. मन पवित्र वा प्रसन्न असणे सर्वाधिक महत्त्वाचे! आपले मन पवित्र, प्रसन्न असेल तर आजूबाजूचे वातावरणही पवित्र, प्रसन्न असते. 

(१६९) दिवस बुडाला मजूर उडाला : रोजाने वा मोलाने काम करणारा पाट्याच टाकणार! तो थोडेच स्वतःचे घरचे समजून काम करणार? त्याच्या कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.

(१७०) दिल्ली तो बहुत दूर है : झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.

(१७१) दृष्टीआड सृष्टी : आपल्या अपरोक्ष जे चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे.

(१७२) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही : दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही.

(१७३) दात आहेत तर चणे नाहीत; चणे आहेत तर दात नाहीत : एक गोष्ट अनुकूल असली तर तिच्या जोडीला आवश्यक अशी दुसरी गोष्ट अनुकूल नसणे. धनसंपत्ती जवळ आहे पण तिचा उपभोग घेण्याची शारीरिक क्षमता नाही, उपभोग घेण्याची शारीरिक क्षमता आहे पण धनसंपत्ती जवळ नाही अशी स्थिती असते.

(१७४) दुनिया झुकती है.. झुकानेवाला चाहिए। : लोकांना मूर्ख बनविणारा अगर फसविणारा एखादा ठकसेन असला तर फसले जाणारे अनेकजण या जगात आहेत. 

(१७५) दुभत्या गायीच्या लाथा गोड : ज्या व्यक्तीपासून काही फायदा होतो तिचा त्रासदेखील सहन करायला माणसाला काही वाटत नाही.

म्हणी – भाषा समृद्धी

(१७६) दुरून डोंगर साजरे : कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते. तिचे खरे स्वरूप 

(१७७) दुष्काळात तेरावा महिना : आधीच्या संकटात आणखी भर पडणे. 

(१७८) दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते : एखाद्या बाबतीत अद्दल घडली की माणूस प्रत्येक बाबतीत (पुष्कळदा अनावश्यक अशीही) सावधगिरी बाळगतो. जवळ गेल्यावरच समजते.

(१७९) देव तारी त्याला कोण मारी? : देवाची कृपा असल्यावर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही. 

(१८०) देखल्या देवा दंडवत: एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. खास देवदर्शनाला न जाणे पण रस्त्यात चुकून देऊळ लागले तर जाता जाता हात जोडण्यातला प्रकार.

(१८१) देश तसा वेष : परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे.

(१८२) दैव देते आणि कर्म नेते : नशिबामुळे उत्कर्ष होतो; नुकसान होते; अशा वेळी ही म्हण वापरतात. पण स्वतःच्या कृत्यामुळे

(१८३) धर्म करता कर्म उभे राहते : एखादी चांगली गोष्ट करीत असता पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

(१८४) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने : दोषयुक्त काम करणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या व अनेक अडचणी येत राहतात. 

(१८५) न कर्त्याचा वार शनिवार : ज्याला एखादे काम करावयाचे नाही तो काही ना काही सबबी सांगून ते काम टाळतो.

(१८६) नखाने काम होते त्याला कुऱ्हाड कशाला : जे काम अल्प साधनाने होते त्याला मोठी शक्ती कशाला? गुळाने मरणाऱ्याला विष कशाला?

(१८७) नवरा मरो नवरी मरो उपाध्यायाला दक्षिणेशी जरूर : कोणाचे काही का होईना; आपले हितसंबंध सुरक्षित राहिले म्हणजे बस्स!

(१८८) न खात्या देवा नैवेद्य : ज्याला एखाद्या गोष्टीची जरुरी नाही त्याला ती गोष्ट देऊ करणे. (कारण तो ती स्वीकारणर नाही, हे मुळातच माहीत असते.) 

(१८९) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये : परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण हलकेपण/गौणत्व पत्करू नये. हे

(१९०) नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे : केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार.

(१९१) नवी विटी नवे राज्य : सगळी परिस्थिती नवीन असणे.

(१९२) नव्याचे नऊ दिवस : कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडाच काळ टिकते. नंतर त्या गोष्टीचे महत्त्व कमी होते. 

(१९३)नावडतीचे मीठ अळणी :- आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीची प्रत्येक कृती आपल्याला चुकीची वाटते. 

(१९४) नाचता येईना, अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरता संबंधित गोष्टीत दोष दाखविणे.

(१९५) नाव मोठं लक्षण खोटं : भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची, कर्तृत्व कमी प्रतीचे.

(१९६) नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा : नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे.

(१९७) नाकापेक्षा मोती जड : एखाद्या गौण वा कमी महत्त्वाच्या व्यक्तीला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व मिळून ती तापदायक ठरणे. गौण वस्तूस मुख्य वस्तूपेक्षा अथवा गौण व्यक्तीस प्रमुख व्यक्तीपेक्षा महत्त्व प्राप्त होणे.

(१९८) नाक दाबले की तोंड उघडणे : दुसरा पर्याय नाही तरच कोणालाही वठणीवर आणता येते.

(१९९) नालामुळे घोडा गमावणे : छोटीशी चूक दुरुस्त न केल्याने परिणामी अधिक नुकसान सोसावे लागते. 

(२००) नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाही : समर्थ किंवा कर्तृत्ववान माणूस खालावला तरी नादान माणसाहून अधिक योग्यतेचा ठरतो. 

महत्वाच्या म्हणी

(२०१) नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे : एखाद्यास लुटून दुसऱ्याची भर करणे.

(२०२) निंदकाचे घर असावे शेजारी : निंदा करणारा माणूस उपयोगी आपल्याला आपले दोष कळतात.

(२०३) पदरी पडले पवित्र झाले! : कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावे ठेवू नयेत. तिच्या बाबतीत समाधान मानावे वा मानून घ्यावे.

(२०४) पळसाला पाने तीनच : सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

(२०५) पडलेले शेण माती घेऊन उठते : चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे जरी कितीही निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच. याचा दुसरा अर्थ असा की, तुम्ही एखादी कृती केली किवा एखादी कृती घडली तर त्यातून काहीना काही निष्पत्ती ही होतेच; क्षुल्लक का होईना फायदा हा होतोच; पडलेले शेण उचलताना जसे त्यास थोडी का होईना माती लागून येतेच.

(२०६) परदुःख शीतल : दुसऱ्याच्या दुःखाची खरी कल्पना कोणास येत नाही. दुसऱ्याच्या वेदना/दुःख यांचे आपणास फारसे महत्त्व वाटत नाही. 

(२०७) पळणाऱ्याास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा : लबाडी करणे सोपे; पण ती शोधून काढणे फार कठीण.

(२०८) प्रयत्नांती परमेश्वर : कितीही अवघड गोष्ट असली तरी ती प्रयत्नाने साध्य होते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!

(२०९) पाचा मुखी परमेश्वर : बहुसंख्य लोक बोलतील ते खरे मानावे; त्या बोलण्याचा मान राखावा. 

(२१०) पाची बोटे सारखी नसतात : सर्वच माणसे सारख्या स्वभावाची नसतात किंवा कोणतीही एक गोष्ट दुसरीसारखी नसते.

(२११) पायाची वहाण पायीच बरी : कोणालाही त्याच्या योग्यतेनेच वागवावे. एखाद्यास त्याच्या लायकीपेक्षा अधिक महत्त्व देऊ नये.

(२१२) पालथ्या घागरीवर पाणी : केलेला उपदेश निष्फळ ठरणे.

(२१३) पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे : आपले काम सोडून नको ती चौकशी करणे.

(२१४) पिंडी ते ब्रह्मांडी  : जे एका छोट्या वस्तूत असते तेच मोठ्या वस्तूत असते.

(२१५) पी हळद हो गोरी : कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. 

(२१६) पुढे तिखट मागे पोचट : दिसायला फार मोठे, पण प्रत्यक्षात तसे नसणारे. दिखने में ढब्बू चलने में शिवराई।

(२१७) पुराणातील वांगी पुराणात : पौराणिक दाखल्याचा वा गोष्टींचा आजच्या व्यवहारात काय उपयोग? या गोष्टी पुराणात असणेच योग्य. त्यांचा अधिक व्यवहारात उपयोग करू जाणे गैर.

(२१८) पुढच्यास ठेच मागचा शहाणा : दुसऱ्याचा अनुभव घेऊन चुका टाळता येतात. 

(२१९) पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा : अल्प मोबदला देऊन भरपूर काम करवून घेणे. आवळा देऊन कोहळा काढणे! 

(२२०) फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय : राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला अथवा चुकीचा असला तरी मानावाच लागतो.

(२२१) फार झाले हसू आले : एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.

(२२२) फुटका डोळा काजळाने साजरा करावा : आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो. तो जेणेकरून झाकता येईल तितका झाकावा.

(२२३) फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे : जेथे वैभव भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे.

(२२४) फूल ना फुलाची पाकळी : पूर्ण मोबदल्याऐवजी अल्पसा का होईना मोबदला देणे.

(२२५) बडा घर पोकळ वासा : दिसण्यात श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. नाव मोठे लक्षण खोटे. 

महत्वाच्या म्हणी

(२२६) बळी तो कान पिळी : बलवान मनुष्यच इतरावर सत्ता गाजवतो. मात्स्यन्याय।(Might is right.)

(२२७) बाप तसा बेटा : मुलगा वडिलांच्याच वळणावर जाणार. जे गुण वडिलांच्या अंगी तेच मुलाच्या अंगी असणार. खाण तशी माती..

(२२८) बाप से बेटा सवाई : वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे. 

(२२९) बापाला बाप म्हणेना तो चुलत्याला काका कसा म्हणेल? : जवळच्या नातेवाइकाला मान न देणारा दूरच्याला मान कसा देणार?

(२३०) बाप दाखव नाही तर श्राद्ध कर : अपराध केला नाही असे सिद्ध तरी करा किंवा अपराध कबूल तरी करा. एखाद्यासमोर अटीतटीचे दोन पर्याय ठेवणे. 

(२३१) बावळी मुद्रा देवळी निद्रा : दिसण्यास बावळट परंतु व्यवहारात चतुर मनुष्य.

(२३२) बाजारात तुरी भट भटणीला मारी उगाचच कल्पनेचा आधार घेऊन भांडण करणे. 

(२३३) बापापरी बाप गेला नि बोंबलताना हात गेला : झालेल्या दुर्घटनेमुळे वा हानीमुळे प्रमाणापेक्षा अधिक हतबल वा दुःखी होण्याने असलेला आधारही घालवून बसणे. एका नुकसानीची भरपाई तर न होणेच; परंतु दुसरे आणखी नुकसान होणे.

(२३४) बारभाईची शेती काय लागेल हाती अनेक भागीदार झाल्याने नफ्याऐवजी नुकसानच जास्त होते. अनेकजणांच्या वेगवेगळ्या विचाराने कोणतेही काम नीट होऊ शकत नाही.

(२३५) बुडत्याला काडीचा आधार : घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे साहाय्यसुद्धा मोलाचे वाटते. 

(२३६) बुडत्याचा पाय खोलात : ज्याची अधोगती होते त्याच्या अधिकाधिक संकटे येतात. एकदा नुकसान होऊ लागले म्हणजे अशी काही दुर्बुद्धी सुचते की त्यामुळे अधिकच नुकसान होते.

(२३७) बुगड्या गेल्या पण भोके राहिली : उत्तम स्थिती गेली; परंतु तिच्या खुणा मागे उरल्या.

(२३८) बैल गेला अन् झोपा केला : विशिष्ट वेळी करणे आवश्यक असलेली गोष्ट ती वेळ निघून गेल्यावर करणे.

(२३९) बोलेल तो करील काय अन् गर्जेल तो पडेल काय? : केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून प्रत्यक्ष कृती होईलच अथवा त्याची तितकी क्षमता असेलच असे नाही.

(२४०) बोलणाऱ्याचे तोंड दिसते करणाऱ्याची कृती दिसत नाही  : रागावणाऱ्याचे शब्द सर्वांना ऐकू येतात; पण वाईट कृती करणाऱ्याचे कृत्य कोणाला चटकन दिसून येत नाही. 

(२४१) बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले : बोलण्याप्रमाणे कृती करणारा माणूस वंदनीय ठरतो.

(२४२) बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी : बोलून सगळ्यांना थक्क करावयाचे पण कृती मात्र शून्य. सगळं बोलणंच, खरं काहीच नाही!

(२४३) भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्या बाबतीत पूर्ण खात्री आहे नेमक्या अशाच ठिकाणी अथवा अशाच व्यक्तीकडून संपूर्ण निराशा होणे.

(२४४) भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी : एखाद्याला आश्रय दिला किंवा त्याच्यावर उपकार केले तर त्याने त्याचा गैरवापर करण्यास सुरुवात करणे किंवा मिळाले त्यावर समाधान न बाळगता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणे. 

(२४५) भरल्या गाड्यास सूप जड नाही : मोठ्या कामात एखादे छोटेसे काम सहज होऊन जाते. 

(२४६) भांडणाचे तोंड काळे : भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो.

(२४७) भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही : भीक मागून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. हलक्या प्रतीच्या प्रयत्नांनी उच्च प्रतीचे ध्येय साकार होऊ शकत नाही. 

(२४८) भित्यापाठी ब्रह्मराक्षस: आपण एखाद्या गोष्टीस घाबरत असलो तर तीच नेमकी आपणापुढे येऊन उभी राहते. भित्र्या माणसाला सतत व अकारण भीतीच वाटत राहते. 

(२४९) भीक नको पण कुत्रा आवर : एखाद्यावर उपकार करता आले नाहीत तर करू नका; पण त्याच्या मार्गात विघ्ने तरी आणू नका असे म्हणण्याजोगी परिस्थिती. 

(२५०) भीड भिकेची बहीण: उगाच भीड बाळगून आपण नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते. आपणास शक्य नसणाऱ्या किंवा न पटणाऱ्या गोष्टी केवळ एखाद्याची भीड मोडवत नाही म्हणून करू नयेत; त्यात आपलेच नुकसान होते.

मराठी म्हणी

(२५१) भुकेला कोंडा निजेला धोंडा : अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची तयारी असणे. 

(२५२) मनास मानेल तोच सौदा : आपल्याला आवडेल तीच गोष्ट करावी. 

(२५३) मरावे परी कीर्तिरूपे उरावे : आपण जगात नसलो तरी कीर्ती राहील असे काम करावे.

(२५४) मनात मांडे पदरात धोंडे : केवळ मोठमोठी मनोराज्ये करावयाची; परंतु प्रत्यक्षात काहीही मिळत नाही अशी स्थिती.

(२५५) मऊ सापडले म्हणून कोपराने म्हणून खणू नये : कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.

(२५६) मन जाणे पापा : आपण केलेले पाप दुसऱ्याला कळले नाही तरी ज्याचे त्याला माहीत असतेच. (त्याची बोचणीही त्यास लागून राहतेच.)

(२५७) मन राजा मन प्रजा: हुकूम करणारे आपले मनच आणि तो मान्य करणारेही आपले मनच 

(२५८) मनाएवढी ग्वाही त्रिभुवनात नाही : मनासारखा खरे सांगणारा साक्षीदार साऱ्या दुनियेत नाही. आपली प्रत्येक कृती आपल्या मनाला माहीत असतेच.

(२५९) मनी वसे ते स्वप्नी दिसे : ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो तीच गोष्ट स्वप्नात दिसते; सतत मनात त्याच गोष्टीचा विचार येतो. 

(२६०) मनाची नाही पण जनाची तरी : एखादे पापकृत्य करताना मनाला नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा.

(२६१) मस्करीची होते कुस्करी : थट्टेचा परिणाम कित्येकदा भयंकर वाईट होतो. 

(२६२) म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात : आपली माणसे आपल्यालाच नकोशी होत नाहीत किंवा स्वतःसाठीच किंवा आपल्याच व्यक्तींसाठी करावयाच्या खर्चाचे वा इतर बाबींचे आपणास ओझे वाटत नाही.

(२६३) म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाही : जी गोष्ट व्हायचीच असेल ती होऊ नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरी ती होतेच.

(२६४) मानला तर देव नाही तर धोंडा : कोणालाही महत्त्व देणे अगर न देणे आपल्या मनावर अवलंबून असते.

(२६५) मातीचे कुल्ले लावल्याने लागत नाहीत : परक्याला आपला म्हणून तो आपला होत नाही.

(२६६) मान सांगावा जना नि अपमान सांगावा मना : आपला सन्मान झाला असेल तर लोकांना सांगावा; पण अपमान झाला असेल तर त्याची वाच्यता करू नये.

(२६७) मारणाऱ्याचा हात धरवतो पण बोलणाऱ्याचे तोंड धरवत नाही : दांडग्या माणसास आवरणे सोपे; पण बोलणाऱ्याला आवर घालता येत नाही. 

(२६८) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी? : अवघड काम करण्यास कोणीही तयार होत नाही.

(२६९) माकडाच्या हातात कोलीत : विघ्नसंतोषी माणसाच्या हातात कारभार सोपवणे. 

(२७०) मिळमिळीत सौभाग्यापेक्षा झळझळीत वैधव्य बरे : दुबळा पती असल्याने लाभणाऱ्या सौभाग्यापेक्षा पराक्रमी व थोर पुरुषाची विधवा असणे भाग्याचे!

(२७१) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात : लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते. 

(२७२) मुंगीला मुताचा पूर: जो पैशाने, शक्तीने किंवा सामध्यनि कमी असतो त्याला थोडासा खर्च वा श्रम अधिक होतात.

(२७३) मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत : नम्रतेने वागून आपला फायदा करून घ्यावा. ताठपणे वागून आपले नुकसान करून घेऊ नये. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती!

(२७४) मेल्या म्हशीला मणभर दूध : एखादी व्यक्ती जगातून गेल्यावर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचे गुणगान करणे. 

(२७५) मेले मढे आगीला भीत नाही : लोचट किंवा निगरगट्ट माणसावर बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही.

मराठी भाषेतील महत्वाच्या म्हणी

(२७६) मौनं सर्वार्थ साधनम् : बडबड करण्यापेक्षा गप्प बसणे सर्वांत उत्तम. पुष्कळदा मौन स्वीकारल्याने अनेक गोष्टी साध्य होतात. 

(२७७) यथा राजा तथा प्रजा : सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात.

(२७८) या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे : बनवाबनवी करणे. 

(२७९) यावच्चंद्र दिवाकरौ : सूर्यचंद्र असेपर्यंत म्हणजेच अनंतकाळपर्यंत. 

(२८०) ये रे माझ्या मागल्या कण्या भाकरी (किंवा ताक कण्या) चांगल्या : एखाद्याने केलेला उपदेश न ऐकून पूर्वीप्रमाणेच वागणे. 

(२८१) रात्र थोडी सोंगे फार : वेळ थोडा आणि त्या मानाने कामे भरपूर असणे.

(२८२) राईचा पर्वत करणे : मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे, पराचा कावळा करणे.

(२८३) राजा बोले दल हाले, काजी बोले दाढी हाले : राजाने हुकूम देताच सैन्य चालू लागते; पण काजीने हुकूम दिला तर त्याच्या स्वतःच्या दाढीच्या केसांशिवाय कोणावरही परिणाम होणार नाही. सामर्थ्यशाली व्यक्तीच्याच बोलाला महत्त्व असते. 

(२८४) राजाला दिवाळी काय कामाची : ज्याच्याकडे अपार वैभव आहे त्याला दिवाळीचे महत्त्व काय? त्याच्याकडे रोजच दिवाळीचा थाट असतो. 

(२८५) राज्याअंती नरक आणि नरकाअंती राज्य : पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही आणि राज्य चालविणे, टिकविणे पापाशिवाय शक्य नाही. Behind every good fortune there is a crime.

(२८६) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी : उद्योगी स्वभावाच्या माणसास मोकळा वेळ मिळाल्यास तो काही ना काही कामे करीतच राहतो; प्रसंगी निरर्थक कामे करतो; पण गप्प बसत नाही.

(२८७) रोज मरे त्याला कोण रडे? : नेहमीच घडणाऱ्या गोष्टीला महत्त्व राहत नाही. 

(२८८) लकडीवाचून कडी वळत नाही : माकडचेष्टा किंवा खोडकरपणाचे उद्योग बंद करण्यासाठी सौम्य उपायांचा परिणाम होत नाही; तर त्यासाठी कडक शिक्षेचाच उपयोग करावा लागतो. त्या त्या लायकीच्या माणसांना त्या त्या प्रकारच्या साधनांचा वापर करूनच वठणीवर आणावे लागते.

(२८९) लष्कराच्या भाकरी भाजणे : बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे.

(२९०) लंकेत सोन्याच्या विटा : दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपणास उपयोग नसतो.

(२९१) लाज नाही मना कोणी काही म्हणा : निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.

(२९२) लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण : लोकांना उपदेश करावयाचा, पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागावयाचे नाही.

(२९३) वरातीमागून घोडे : योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ. 

(२९४) वळणाचे पाणी वळणावरच जाणार : निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावयाच्या त्या घडतच राहणार; माणसेही आपल्या सवयींप्रमाणे, स्वभावाप्रमाणे व संस्कारांप्रमाणेच वागणार.

(२९५) व्यक्ती तितक्या प्रकृती : जितकी माणसे भिन्न असतात तितका प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो. 

(२९६) वारा पाहून पाठ द्यावी : परिस्थिती पाहून वर्तन ठेवावे. 

(२९७) वासरात लंगडी गाय शहाणी : अडाणी माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो. 

(२९८) वाहत्या गंगेत हात धुणे : सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. 

(२९९) वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही : सरळ मार्गाने काम होत नाही; म्हणून थोडा तरी वाकड्या मार्गाचा अवलंब करावाच लागतो.

(३००) व्याप तितका संताप : कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी जास्त असते.

मराठी भाषेतील म्हणी

(३०१) विशी विद्या तिशी धन : योग्य वयात योग्य ती कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो.

(३०२) विटले मन आणि फुटले मोती सांधत नाही : एखादी वस्तू नावडती झाली की ती आवडती होणे कठीण असते. दुभंगलेली मने पुन्हा जुळली जाणे अवघड ठरते.

(३०३) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर : आपली सगळी चीजवस्तू बरोबर घेऊन फिरणे. 

(३०४) शहाण्याला शब्दाचा मार: शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते. 

(३०५) वाघ म्हटले तरी खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच : वाघाला वाघ म्हटले काय, वाघोबा म्हटले काय किंवा वाघ्या म्हटले काय, तो आपल्या गुणधर्माप्रमाणेच वागणार. थोडक्यात, तुम्ही एखाद्याशी कितीही चांगले वागा तो त्याचें गुणधर्म दाखविणारच! (वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातोच, मग वाघ्याच का म्हणू नये?)

(३०६) शितावरून भाताची परीक्षा : थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते. एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थाची तपासणी करता येते अथवा गुणधर्म समजून घेता येतात.

(३०७) शिकविलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही : एखाद्या जड बुद्धीच्या माणसाला कोणी वेळेपुरते शिकविले तरी तो आयत्या वेळी गांगरून जातो

(३०८) शेरास सव्वा शेर : चोरावर मोर. एकाला दुसरा वरचढ भेटणे. (३०९) शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी : एखाद्याने आपल्यासाठी काही काम केले असता, त्याने त्यासाठी किती परिश्रम केले असतील अथवा किती यातना सोसल्या असतील, त्याचा विचार न करता त्याच्या कामातील उणिवा काढणे.

(३१०) शेजी देईल काय आणि मन धायेल काय? : शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही. आपल्या माणसाने मायेने वा आपुलकीने एखादी कृती करणे व परक्याने सहानुभूतीपोटी एखादी कृती करणे यांमध्ये फरक हा असतोच. 

(३११) सत्तेपुढे शहाणपण नाही : ज्याच्याकडे अधिकाराचे बळ आहे तो वाटेल ते करू शकतो.

(३१२) समर्थाघरचे श्वान, त्याला सर्वही देती मान : मोठ्या माणसाच्या बगलबच्च्यांना योग्यता नसतानाही मोठे समजण्यात येते.

(३१३) सरड्याची धाव कुंपणापर्यंत : एखाद्याने कितीही आव आणला तरी तो त्याची शक्ती, वकूब वा ऐपत यांपेक्षा अधिक काही करू शकत नाही. प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते. 

(३१४) सगळेच मुसळ केरात : मुख्य व महत्त्वाच्या गोष्टीकडेच दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम अथवा केलेले सर्व प्रयत्न वाया जाणे

(३१५) संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी : न होणाऱ्या कामास प्रारंभापासून तयारी करणे.

(३१६) सारा गाव मामाचा एक नाही कामाचा : जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यांपैकी कोणाचाच उपयोग न होणे किंवा त्यांपैकी कोणी उपयोगी न पडणे.

म्हणी

(३१७) साखरेचे खाणार त्याला देव देणार : भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.

(३१८) सारी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही : जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते.

(३१९) साप साप म्हणून भुई थोपटू नये : संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे, निरुपद्रवी व्यक्तीलाच उपद्रवी समजून अथवा नसलेल्या संकटालाच संकट समजून त्याच्या निराकरणार्थ व्यर्थ खटाटोप करणे.

(३२०) सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही : मानी माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा ताठा कायम राहतो.

(३२१) सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही : क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.

(३२२) सुपातील हसतात, जात्यातील रडतात : ज्या वेळी समान परिस्थितीतील अनेकांवर एखादे संकट कोसळते त्या वेळी काही जणांवर त्याचा पहिला आघात होतो (जात्यातील). अशा वेळी उरलेल्यांना आपण वाचलो याचे समाधान वाटते (सुपातील). पण आज ना उद्या त्यांचाही बळी जाणार असतोच.

(३२३) हाजीर तो वजीर : जो ऐन वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. 

(३२४) हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते : आजार, संकटे येतात ती लवकर व मोठ्या प्रमाणावर येतात; पण कमी होताना हळूहळू कमी होतात.

आणखी एक अर्थ- लक्ष्मी किंवा वैभव वाजतगाजत येते; परंतु लयाला जाताना मुंगीच्या पावलांनी म्हणजे आवाज न करता जाते; ते कधी गेले तेच समजत नाही. 

(३२५) हत्ती गेला अन् शेपूट राहिले : कार्याचा मोठा भाग पार पडून थोडासा भाग शिल्लक राहणे. (अन् हा राहिलेला थोडासा भागच पार पाडणे कठीण जाणे.) 

(३२६) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र : दुसऱ्याला त्याग करावयास सांगून आपण नामानिराळे राहणे किंवा स्वतःस झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.

(३२७) हपापाचा माल गपापा : फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे.

(३२८) हा सूर्य हा जयद्रथ : प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.

(३२९) हात फिरे तिथे लक्ष्मी वसे : उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. 

(३३०) हात ओला तर मित्र भला : फायदा असेपर्यंत सगळे गोळा होतात. तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात. 

(३३१) हातच्या कांकणाला आरसा कशाला? : स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा कशाला?

(३३२) हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे : जे आपल्या हातात आहे ते दुसरे मिळेल या आशेने सोडू नये; नाही तर जवळ असलेलेही गमावण्याची पाळी येते. 

(३३३) ह्या हाताचे त्या हातावर : वाईट कृत्याची फळे लगेच मिळतात. 

(३३४) हिरा तो हिरा गार ती गार : गुणी माणसाचे गुण प्रगट झाल्यावाचून राहत नाहीत.

Leave a Reply