You are currently viewing मराठी शुद्धलेखनाचे नियम

मराठी शुद्धलेखनाचे नियम

मित्रांनो प्रत्तेक भाषेची लेखनाची पद्धत ही वेगवेगळी आहे. प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. तर आज आपण मराठी भाषेचे शुद्धलेखनाचे नियम समजून घेणार आहोत.

शब्दाच्या शेवटी येणारे इ-कार व उ-कार

 1. एकाक्षरी मराठी ई-कार, ऊ-कार दीर्घ असतात. उदाहरणार्थ: मी, ही, ती, जी, पी, बी, ऊ, तू, धू, जू. पू.
 2. मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इ-कार व उकार दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ: कवी, वही, नदी, काठी, वाटी, दाटी, पेटी, टोपी, पिशवी, काकी, गिरणी, सुपारी, चेंडू, खेळू, वाळू, दांडू, बोरू, प्रीती, रघू.
 3. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे तत्सम शब्द जरी मुळात न्हस्वान्त असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ : अन्योक्ती, संधी, कुलगुरू, अतिथी.
 4. पुढील तत्सम अव्यये हस्वान्तच लिहावीत. उदाहरणार्थ : परंतु, अद्यापि, तथापि, अति, इति, प्रभृति, यथामति, नि, आणि.

शब्दाच्या उपान्त्यी येणारे इ-कार व उ-कार

 1. मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इ-कार व उकार दीर्घ असतात. उदाहरणार्थ : वीर, नीर दीर, खीर, पीठ, पूल, सून, जमीन, बहीण, कबूल, म घेऊन, ठाऊक.
 2. पण तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतप्रमाणे स्वद लिहावेत. उदाहरणार्थ : गुण, बुध, सुख, हिम शिव, मधुर, मंदिर, अनिल, नागरिक सामाजिक, स्थानिक, कुसुम, 
 3. मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असले तर त्याच्यामागील म्हणजे उपान्त अक्षर इ-कार व उ-कार -हस्व असतो. उदाहरणार्थ : विडा, दिवा, गुणी, मेहुणी, वकिली, महिना, सुरू, सुगी, किती, बिन ठेविले.
 4. पण तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे ई-कारान्त वा ऊ-कारान्त असतील तर मराठीत ती मूळ संस्कृतप्रमाणे दीर्घच ठेवावीत. उदाहरणार्थ : पूजा, प्रीती, भीती, पूर्व, शरीर, परीक्षा, कीर्ती, नीच, शील, लोटा नीती.
 5. मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्यापूर्वी इ-कार व उकार बहुधा ऱ्हस्व असतात. उदाहरणार्थ चिंच, उंच, सिंह, चित्त, सुप्रिया, दुःसह, दुःशाप, छिः, थुः, निःसीम निःपात.
 6. पण तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे -हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: पुण्य, चरित्र, तीक्ष्ण, धूम्र, सूक्ष्म. 

सामान्य रूपांविषयीचे नियम

 1. इ-कारान्त व उ-कारान्त तत्सम शब्दांचे सामान्य रूप करताना अन्त्य स्वर दीर्घ होतो.. उदाहरणार्थ : रवि- रवीला– रवीची, गुरू- गुरूचा- गुरूसाठी (मराठी रवी, गुल हे शब्द दीर्घच लिहिले जातात.)
 2. मराठी शब्दांचे उपान्त्य अक्षर ई किंवा ऊ-युक्त असेल तर त्याचे सामान्य रूप ते करताना ते न्हस्वच लिहावे. उदाहरणार्थ : सून- सुनेला, मीठ- मिठाला, वीट- विटेने, बहीण- बहिणीला, कोल्हापूर- कोल्हापुरास.
 3. पण तत्सम शब्दचि उपान्त्य अक्षर किंवा ऊक्त असेल तर त्यांचे मान्यरूप करताना ते मूळ अक्षराप्रमाणे दीर्घच लिहावेत. उदाहरणार्थ :- पूजा – पूजेला, नीती- नीतीने, परीक्षा परीक्षेत, गीता- गीतेतील 
 4. एकारान्त शब्दाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते. उदाहरणार्थ :- आमचे आमच्यासाठी, कावळे- कावळ्यांनी, घेणे – घेण्यासाठी.
 5. उपान्त्य अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ हा स्वर असेल तर ‘ई’ बद्दल ‘य’ व ‘ऊ’ बदल ‘व’ होतो. उदाहरणार्थ :- पाऊस पावसात, राऊळ- रावळात, देऊळ- देवळात, काईल कायलीत, बाईल- बायलीला. 
 6. काही तीन अक्षरी शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ असेल तर ‘ई’ व ‘क’ यांच्या जागी ‘अ’ हा आदेश होतो. उदाहरणार्थ :- उंदीर- उंदरास, परीट – परटाला, बेडूक- बेडकास, ढेकूण- ढेकणास. 
 7. शब्दाचे शेवटचे अक्षर ‘सा’ असल्यास सामान्य रूपाच्या वेळी ‘शा’ होतो.. उदाहरणार्थ : ससा- सशाचे, घसा- घशात, मासा- माशाचा.
 8. मूळ शब्द ‘श’ असेल तर ‘श’ तसाच राहतो. उदाहरणार्थ : माशा- माशांचा, जोशी- जोशांचा, दिशा- दिशांना 
 9. शब्दाच्या शेवटी ‘जा’ अक्षर असेल तर ते तसेच राहते. त्याचा ‘ज्या’ होत नाही. उदाहरणार्थ :- राजा- राजाने, बाजा- बाजाची. 
 10. मधल्या अक्षरातील ‘क’ किंवा ‘प’ चे द्वित्व जाऊन केवळ ‘क’ व ‘प’ होतो. उदाहरणार्थ :- तिप्पट- तिपटीने, डुक्कर- डुकराला, रक्कम- रकमेची. 
 11. मधल्या ‘म’ पूर्वीच्या सानुस्वार अक्षरातील अनुस्वार जातो. उदाहरणार्थ : जंमत- जमतीने, किंमत- किमतीचा, हिंमत- हिमतीने.

सामासिक, साधित व पुनरुक्त शब्द 

 1. सामासिक व साधित शब्दांतील पहिले पद उ-कारान्त किंवा इ-कारान्त संस्कृत शब्द असेल तर मूळ शब्दाप्रमाणे ते हस्वान्तच लिहावे. उदाहरणार्थ : हरिकृपा, वायुपुत्र, लघुकथा, भक्तिपर, मृत्युपत्र, गुरुप्रेम, शत्रुपक्ष, रविवार, शनिवार.
 2. सामाजिक व साधित शब्दांतील पहिले पद ई-कारान्त किंवा ऊ-कारान्त संस्कृत शब्द असेल तर ते मूळ शब्दाप्रमाणे दीर्घान्तच लिहावे. उदाहरणार्थ : वधूपरीक्षा, नदीतीर, गौरीहार, राजनीती, वाणीवैभव, पृथ्वीतल, वधूवर, भूगोल, दासीजन.
 3. मराठीतील सामाजिक किंवा पुनरुक्त शब्दांच्या बाबतीत घटक शब्द यथोच्चार दीर्घ किंवा न्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ विटीदांडू, रात्रंदिवस, राखीपौर्णिमा, रीतीभाती, पोळीभाजी, आनंदीआनंद तुळशीपत्र.
 4. संस्कृतमधील ‘इन्’ प्रत्ययात्न शब्द मराठीत दीर्घ लिहितात. उदाहरणार्थ : शशिन्- शशी, पक्षिन्- पक्षी, योगिन्- योगी, विद्यार्थिन् विद्यार्थी पण सामाजिक शब्दांत मात्र हेच शब्द पहिल्या पदी आल्यास हस्व होतात. उदाहरणार्थ : शशिकला, स्वामिनिष्ठ, योगिराज, विद्यार्थिगृह, मंत्रिमंडळ पक्षिगण. 

ऊ, ऊन, इक, य, त्य या प्रत्ययांविषयीचे नियम 

धातूला ‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी ‘व’ असेल तरच ‘वू किंव उदाहरणार्थ : गा- गाऊ- गाऊन, धाव- धावू धावून. 

नामांना प्रत्यय लागून तत्सम विशेषणे तयार होतात त्या वेळी मूळ शब्दातील ‘वून’ होते. शेवटचा स्वर निघून जातो व त्या शब्दाच्या प्रारंभीच्या अक्षरातील स्वराची वृद्धी होते. (अ-आ ची वृद्धी आ; इ-ई-ए ची वृद्धी ऐ; उ-ऊ-ओ ची वृद्धी औ.) उदाहरणार्थ : नगर- नागरिक, दिन- दैनिक, भूगोल- भौगोलिक अपवाद : ‘इक’ प्रत्यय युक्तार्थी असेल तर वृद्धी होत नाही. उदाहरणार्थ :- क्रम- क्रमिक, श्रम- श्रमिक, धन- धनिक, रस- रसिक, सुवास सुवासिक.

नामाला ‘य’ प्रत्यय लागताना व शब्दाला ‘त्य’ प्रत्यय लागताना पहिल्या स्वराची वृद्धी होते. उदाहरणार्थ :- पवित्र- पावित्र्य, विशिष्ट- वैशिष्ट्य, कुशल- कौशल्य.

अनुस्वारांविषयीचे नियम 

 1. ज्या अक्षरावरील अनुस्वाराचा स्पष्ट उच्चार होतो, त्या अक्षरावर अनुस्वार देतात. उदाहरणार्थ : अंबर, अंगण, कंकण, कुंकू, कंठ, सुंठ, मुंबई, करंजी, हिंदुविध चिंच, गंगा, अलंकार.
 2. यू, र, लू, वू, श, ष, स, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संस्कृतप्रमाणे शीषचंद्र लिहावा. उदाहरणार्थ: संवाद, संयम, संरक्षण, संलग्न, संशय, कंस, संस्कार, संहार, संज्ञा, संयोगिता, मांस, अंश, सिंह,
 3. संस्कृमधून मराठीत जशाच्या तशा आलेल्या शब्दातील अनुस्वार पुढे येणाऱ्या व्यंजनांच्या वर्गातील पंचमवर्णाने लिहितात उदाहरणार्थ:- गंगा – गङगा, घंटा – घण्टा, अंत-अन्त, छद-छन्द, अबुज- अम्बुज
 4. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांना विभक्तिप्रत्यय अथवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ: गावात- गावांत, घरात- घरांत, मुलासाठी- मुलांसाठी, त्याच्याकडे- त्यांच्याकडे
 5. अनुच्चारित अनुस्वार आता काढून टाकलेले आहेत. नाव, गाव, पाखरू, सावळा, काटा, कोवळा, पहाट, लाकूड, नाही,काही.
 6. याखेरीज वेगळे असे पूर्वीच्या नियमांनुसार जे अनुस्वार आपण देत होतो ते आता देऊ उदाहरणार्थ: तीं- ती, घरीं- घरी, जेव्हां- जेव्हा, कीं- की, टोंक- टोक, मीं- मी.
 7. आदरार्थी बहुवचनाच्या वेळी अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ : वडिलांचे नेहरूचे, आपणांस, महोदयांनी, माननीयांस
 8. सष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकाने युक्त अक्षरांवर, तसेच नाम आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर येणाऱ्या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देऊ नयेत. पण अनुस्वार दिल्यामुळे त्या शब्दाच्या दोन अर्थामध्ये घोटाळा होण्याची शक्यता असेल तर तो अनुस्वार परसवर्णाने दाखविणे जास्त चांगले. उदाहरणार्थ : देहांत (अनेक देहांत); देहान्त (मरण) तसेच शालान्त, वृत्तान्त, सुखान्त, वेदान्त

संकीर्ण नियम

 1. ग्रामनामास लागून येणाऱ्या पूर’ शब्दातील ‘पू’ दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ: नागपूर, रामपूर.
 2. एकादा’ ऐवजी ‘एखादा’, ‘कोणचा’ ऐवजी ‘कोणता’ अशी रूपे लिहावीत. 
 3. हळूहळू, तसूतस्, मधूनमधून या पुनरुक्त शब्दांच्या घटक शब्दांतील ‘ऊ’ दीर्घ आहे. म्हणून तो दीर्घ लिहावा. मात्र पुनरुक्त शब्द नादानुकारी असेल तर तो उच्चाराप्रमाणे र्हस्व लिहावा. उदाहरणार्थ : रुणुझुणु, दुडुदुडु, लुटुलुटु
 4. पूर्वीचे व्यंजनान्त शब्द ‘अ’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ साक्षात् – साक्षात, विद्वान् – विद्वान, अर्थात् – अर्थात क्वचित् – क्वचित पश्चात् – पश्चात, विद्युत् – विद्युत, श्रीमान् -श्रीमान भगवान्- भगवान, संसद् – संसद. अपवाद: ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त (‘न’ चा पाय मोडून) लिहावा.
 5. परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहिताना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावत उदाहरणार्थ : प्रिन्सिपल, डॉक्टर, स्टेशन, इंजिनीयर, रेडिओ, कॉन्ट्रॅक्ट 
 6. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप शेवटचे ‘अ’कारान्त अक्षर पाय मोडून लिहू नये. उदाहरणार्थ वॉटसन, एम. ए., एम. एड., एलएल. एम. 
 7. काही क्रियापदांची आज्ञार्थी रूपे मूळ धातूपेक्षा वेगळी होतात. उदाहरणार्थ : पाहणे- पहा, राहणे- रहा, वाहणे- वहा. अर्थात ही रूपे पाहा, राहा वाहा अशी लिहावयास हरकत नाही.
 8. कवितेत गणमात्रांचे बंधन पाळावे लागते; त्यामुळे लेखनविषयक नियमांप्रमाणे हस्व दीर्घाचे बंधन पाळता येत नाही. अशा वृत्तास अनुसरून ऱ्हस्व वा दीर्घ शब्द लिहावेत. कवीला या बाबतीत स्वातंत्र्य आहे.
 9. वर दिलेले नियम केशवसुत व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासूनच्या मराठी साहित्याला व लेखनाला लागू करावेत. त्यापूर्वीचे लेखन मुळाप्रमाणे छापावे.
 10. लेखनात वक्त्याच्या किंवा एखाद्या पात्राच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. उदाहरणार्थ : राजा म्हणाला, “मला वाटतं की त्याचं सांगणं खोटं नाही.” अशा ठिकाणी अकारान्त शब्द सानुस्वार लिहावेत. मात्र इतर वेळी अशी वाक्ये लिहू नयेत.

Leave a Reply