विराम म्हणजे थांबणे. त्यासाठी उपयोगात येणारी चिन्हे म्हणजे विरामचिन्हे. बोलताना, भाषण करताना आवाजाच्या चढउतारावरून ऐकणाऱ्याला योग्य तो अर्थ समजत असतो. कारण वाक्य कोठे तोडावयाचे, कोठे थांबावयाचे हे आपल्याला माहीत असते. मात्र लिहिताना वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारावयाचे हे समजण्यासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर केला जातो. विरामचिन्हांच्या साहाय्याने आपल्याला त्या लिहिण्यातील आशय किंवा अर्थ अधिक स्पष्ट करता येतो.
विरामचिन्हे कोणकोणती आहेत आणि त्यांचा उपयोग केव्हा करावयाचा ते पुढे दिले आहे.
पूर्णविराम (.)
केवल, संयुक्त व मिश्र वाक्य ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी पूर्णविराम देतात.
उदाहरणार्थ : मी अभ्यास केला.
त्याचप्रमाणे शब्दांच्या संक्षिप्तीकरणासाठी आद्याक्षरापुढे पूर्णविराम देतात.
उदाहरणार्थ: सा.न.वि.वि. (साष्टांग नमस्कार विनंती विशेष) पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)
स्वल्पविराम (,)
वाक्यात थोडेसेच थांबावयाचे असेल तेव्हा किंवा नामे, सर्वनामे, विशेषणे क्रियापदे वगैरे एका जातीचे अनेक शब्द किंवा अनेक वाक्यांश एकापाठोपाठ आल्यानंतर ते जोडण्यासाठी स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ :- १) आपण माझे व्याख्यान शांतपणे, गंभीरपणे एकून त्याला उत्स्फूर्तपणे मनापासून दाद दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. २) गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा, कोयना या भारतीय नद्या आहेत.
संबोधन दर्शवितानाही स्वल्पविराम देतात.
उदाहरणार्थ :- निखिल, चटकन आवर.
अर्धविराम (;)
स्वल्पविरामापेक्षा जास्त थांबावे लागत असेल किंवा एक विचार पूर्ण होत असेल पण वाक्य पूर्ण होत नसेल तेथे अर्धविराम वापरतात.
उदाहरणार्थ : श्रोते मोठ्या प्रमाणावर जमले होते; पण वक्तेच आले नव्हते.
प्रश्नचिन्ह (?)
प्रश्न विचारण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी जे वाक्य लिहिले जाते, त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :- १) तुम्ही केव्हा आलात? २) या कॉलेजपासून युनिव्हर्सिटी किती लांब आहे?
उद्गारचिन्ह (!)
एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना जे शब्द बाहेर पडतात, त्या शब्दांच्या शेवटी आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ : १) शाब्बास! छान गुण मिळवलेस. २) काय अफाट जनसागर जमलाय!
अवतरणचिन्ह (‘-‘) (“-“)
एखाद्या विशिष्ट शब्दाला वाक्यात महत्त्व द्यावयाचे असेल तर एकेरी अवतरणचिन्ह वापरतात. एखाद्याचे वाक्य अथवा बोलणे उद्धृत करावयाचे असेल तर दुहेरी अवतरणविह वापरतात.
उदाहरणार्थ : १) पुणे हे ‘विद्येचे माहेरघर’ आहे. २) शिक्षक म्हणाले, “आज आपण नवीन पाठाला सुरुवात करू या.”
संयोगचिन्ह (-)
ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण लिहिला गेल्यास तो पुढील ओळीत पूर्ण करण्यासाठी तसेच दोन शब्द जोड़ताना हे चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :- शाळा-पत्रक, जेधे-जवळकर, वस्तु-भांडार, काव्य- संग्रह इत्यादी.
कंस ()
नाटकातील काही क्रियासूचक शब्द किंवा वाक्ये लिहिताना तसेच एखाद्या शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी किंवा वाक्यातील एखादा शब्द नंतर लिहावयाचा असून अगोदर लिहिला गेला असेल तर कंस वापरतात.
उदाहरणार्थ :- १) खाविंद, (मुजरा करून) आपल्याला भेटायला बिरबल उत्सुक आहे. २) तुला या परीक्षेत यश (नक्कीच) मिळणार.
विसर्ग (:)
एखाद्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी काही उदाहरणे किंवा दाखला देण्यासाठी हे चिन्ह वापरतात.
उदाहरणार्थ :- १) सहलीसाठी जाताना पुढील वस्तू बरोबर घ्याव्यात : पिशवी, टॉवेल, मफलर, स्वेटर, ग्लास. २) भारतातील मुख्य ऋतू तीन: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
अपसारणचिन्ह ( – )
बोलता बोलता विचारांची मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास हे चिन्ह वापरतात. या चिन्हास ‘स्पष्टीकरण चिन्ह’ म्हणूनही ओळखले जाते.
उदाहरणार्थ :- मी त्या गावात शिरले मात्र, तितक्यात – ती विद्यार्थिनी- जिने प्रथम क्रमांक मिळविला- आपल्याच शाळेत आहे.