मराठी ही खूप समृद्ध भाषा मानली जाते. मराठी वळवावी तशी वळते. मराठीचे अनेक रंग आहेत. या भाषेला आपण नटवावी तशी नटवू शकतो. आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी आज आपण “शब्दसमूहाबद्दल एक शब्द” जाणून घेणार आहोत. तब्बल ३२० नवीन शब्द व त्यांचे अर्थ आपण जाणून घेऊ.
मराठी व्याकरणात या मागील लेखांमध्ये आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द समजून घेतले. जर तुम्ही वाचले नसतील तर नक्की वाचा
शब्दसमूहाबद्दल एक शब्द खालीलप्रमाणे
- ज्याला कधीही मृत्यू नाही असा :- अमर
- ज्याचा कधीही वीट येत नाही असे :- अवीट
- मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण :- अन्नछत्र
- ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे :- अनुपम अनुपमेय
- कोणाचाही आधार नाही असा :- निराधार, अनाथ
- ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे :- अनमोल
- मागाहून जन्मलेला (धाकटा भाऊ) :- अनुज
- पूर्वी कधीही न घडलेले :- अभुतपुर्व
- जे टाळले जाऊ शकत नाही असे :- अपरिहार्य
- एखाद्या गोष्टीची उणीव असणारी स्थिती :- अभाव
- एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा :- अष्टवधानी
- पायात पादत्राणे न घालता :- अनवाणी
- पूर्वी कधीही न ऐकलेले :- अश्रुतपूर्व
- पूर्वी कधीही न पाहिलेले :- अदृष्टपूर्व
- कोणाच्याही पक्षात सामील न होणारा :- अपक्ष
- जे साध्य होत नाही ते :- असाध्य
- देवलोकातील स्त्रिया :- अप्सरा
- नेत्याचे अनुकरण करणारे व त्याच्या मागून जाणारे :- अनुयायी
- ढगांनी झाकलेले :- अभ्रच्छादित
- कधीही विसरता न येणारे :- अविस्मरणीय
- वर्णन करता येणार नाही असा :- अवर्णनीय
- कधीही नाश पावणार नाही असा :- अविनाशी
- ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा :- अजिंक्य
- सूचना न देता येणारा पाहणा :- आगंतुक
- तुलना करता येणार नाही असे :- अतुलनीय
- निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था :- अनाथाश्रम
- पडदा दूर करणे :- अनावरण
- थोडक्यात समाधान मानणारा :- अल्पसंतुष्ट
- कमी आयुष्य असलेला :- अल्पायुषी अल्पायु
- एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे :- अन्योक्ति
- अग्नीची पूजा करणारा :- अग्निपूजक
- ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा :- अद्वितीय, अजोड
- ज्याला एकही शत्रू नाही असा :- अजातशत्रू
- विविध बाबींत प्रवीण असलेला :- अष्टपैलू
- ज्याने लग्न केले नाही असा :- अविवाहित, ब्रह्मचारी
- ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे :- अथांग
- घरी पाहुणा म्हणून आलेला :- अतिथी
- अतिशय उंच :- अत्युच्च
- अनुभव नसलेला :- अननुभवी
- अन्न देणारा :- अन्नदाता
- मोजता येणार नाही इतके :- अगणिक असंख्य
- आवरता येणार नाही असे :- अनावर
- विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य :- अतिक्रमण
- आकाशातील ताऱ्यांचा पट्टा :- आकाशगंगा
- जिवंत असेपर्यंत :- आजन्म
- मरण येईपर्यंत :- आमरण
- थोरांनी लहानांच्याप्रती व्यक्त केलेली सदिच्छा :- आशीर्वाद
- मनाला आल्हाद देणारा :- आल्हाददायक
- ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा :- आजानुबाहु
- लग्नात द्यावयाची भेट :- आहेर
- हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत :- आसेतूहीमाचल
- नसलेली गोष्ट आहे असे वाटणे :- आभास
- संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत :- आपदमस्तक
- देव आहे असे मानणारा :- आस्तिक
- स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र :- आत्मचरित्र
- बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण :- आबालवृद्ध
- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी :- आदिवासी
- वाटेल तसा पैसा खर्च करणे :- उधळपट्टी
- सतत पैसा खर्च करणारा :- उधळ्या
- ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा :- उपकृत
- उदयाला येत असलेला :- उदयोन्मुख
- शिल्लक राहिलेले :- उर्वरित
- जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा :- उभयचर
- घरदार नसलेला :- उपऱ्या
- सुर्याचे उत्तरेकडे जाणे :- उत्तरायण
- शापापासून सुटका :- उ:शाप
- सतत उद्योगात मग्न असणारा :- उद्यमशील
- हळूहळू घडून येणारा बदल :- उत्क्रांती
- सतत एकटे राहण्याची आवड असलेला :- एकलकोंडा
- श्रम न करता खाणारा :- ऐतखाऊ
- लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत :- अंगाई
- अंग राखून काम करणारा :- अंगचोर
- दुसऱ्याच्या ताब्यात असलेला :- अंकित
- निरनिराळ्या राष्ट्रातील :- आंतरराष्ट्रीय
- आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा :- कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
- कर्तव्याकडे पाठ फिरविणारा :- कर्तव्यपराङमुख
- जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी :- कमलाक्षी
- अंगी एखादी कला असणारा :- कलाकार, कलावंत, कलावान
- दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा :- कनवाळू
- कष्टाने मिळणारी :- कष्टसाध्य
- कानास गोड लागणारे :- कर्णमधुर
- कामाची टाळाटाळ करणारा :- कामचुकार
- भाकरी करण्याची लाकडी परात :- काथवट
- सर्व इच्छा पूर्ण करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय :- कामधेनू
- कार्य करण्यास सक्षम असलेला :- कार्यक्षम
- अंधाऱ्या रात्रींचा पंधरवडा :- कृशपक्ष
- केलेले उपकार विसरणारा :- कृतघ्न
- केलेले उपकार जाणणारा :- कृतज्ञ
- धान्य वा तत्सम वस्तू साठविण्याची जागा :- कोठार
- ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा :- कोट्याधीश
- कुंजात विहार करणारा :- कुंजविहारी
- मडकी बनविणारा :- कुंभार
- शीघ्रतेने किंवा अकस्मात घडून आलेला बदल :- क्रांती
- सतत पैसे खर्च करणारा :- खर्चिक
- आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र :- खेळगडी
- जन्मतःच श्रीमंत असलेला :- गर्भश्रीमंत
- जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी :- गजगामिनी
- सापांचा खेळ करणारा :- गारुडी
- गडाचा वा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी :- गडकरी
- गावाभोवतालचा तट गावाचा कारभार :- गावकुस
- देवळाच्या आतील भाग :- गाभारा
- गावाचा कारभार :- गावगाडा
- पंचांच्या माध्यमातून गावाचे स्थानिक शासन चालविणारी संस्था :- ग्रामपंचायत
- डोंगरात राहणारे लोक :- गिरीजन
- गुप्त बातम्या काढणारा :- गुप्तहेर
- गुणांची कदर करणारा :- गुणग्राहक
- गुरूंकडे आपल्याबरोबर शिकणारा :- गुरुबंधू
- अचानक आलेले संकट :- घाला
- मोठ्याने केलेले पाठांतर :- घोकंपट्टी
- नावाचा एकसारखा उच्चार :- घोषा
- चार पायांवर चालणारा :- चतुष्पाद
- चारही वेदांमध्ये पारंगत असणारा :- चतुर्वेदी
- ज्याच्या हातात चक्र आहे असा :- चक्रपाणी
- चहाड्या सांगणारा :- चहाडखोर
- गावच्या कामकाजाची जागा :- चावडी
- पुष्कळ दिवस जगणारा :- चिरंजीव
- चुगल्या सांगणारा :- चुगलखोर
- जिचे मुख चंद्राप्रमाणे आहे अशी :- चंद्रमुखी
- जग जिंकणारा :- जगज्जेता
- केवळ पाण्यात राहणारा :- जलचर
- जेथे जन्म झाला तो देश :- जन्मभूमी
- नावाचा एकसारखा उच्चार (जयजयकार) :- जयघोष
- रात्री जागून गावात पहारा करणारा :- जागल्या
- जाणण्याची इच्छा :- जिज्ञासा
- जाणून घेण्याची इच्छा असलेला :- जिज्ञासू
- जिल्हयाचा कारभार पाहणारी संस्था :- जिल्हापरिषद
- त्या वेळचा :- तत्कालीन
- तहांच्या अटींचा तर्जुमा :- तहनामा
- तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख :- ताम्रपट
- तोंडावर (तोंडदेखली) स्तुती करण्याचा गुण :- तोंडपूजेपणा
- सूर्याचे दक्षिणकडे जाणे :- दक्षिणायन
- अस्वलांचा खेळ करणारा :- दरवेशी
- दानधर्म करण्यात प्रसिद्ध :- दानशूर
- दिवसाला भिणारे :- दिवाभीत
- दोन वेळा जन्मलेला :- द्विज
- सतत उद्योग करणारा :- उद्योगी
- जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा :- दीपस्तंभ
- खूप आयुष्य असलेला :- दीर्घायुषी
- तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश :- द्वीपकल्प
- देशाची सेवा करणारा :- देशभक्त
- दोन्ही थड्या (किनारे) भरून वाहणारी नदी :- दुथडी
- एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे :- देशांतर
- नशिबावर विश्वास ठेवून वागणारा :- दैववादी
- दररोज प्रसिद्ध होणारे :- दैनिक
- चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा :- दुराग्रही
- एकाने दुसऱ्यास सांगणे या पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेली, परंतु आधार नसलेली गोष्ट :- दंतकथा
- एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे :- धर्मांतर
- शेवटी जे मिळवावयाचे (साध्य करावयाचे) आहे ते :- ध्येय
- यात्रेकरूंच्या निवाऱ्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत :- धर्मशाळा
- उंचावरून कोसळणारा पाणलोट :- धबधबा
- नऊ दिवस टिकणारा ताप :- नवज्वर
- नवीन मतांचा पुरस्कार करणारा :- नवमतवादी
- संपूर्ण शरीरभर किंवा पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत :- नखशिखांत
- रात्रंदिवस एकाच गोष्टीचा नाद असलेला :- नादिष्ट
- न्याय देण्याच्या बाबतीत कठोर :- न्यायी, न्यायनिष्ठूर
- कसलीही अपेक्षा नसणारा :- निरपेक्ष
- कुणाचीही भीड न बाळगणारा :- निर्भीड
- ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा :- निर्भय
- मुलगा नसलेला :- निपुत्रिक
- कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा :- निष्पक्षपाती
- घरादारास व मायभूमीस मुकलेला :- निर्वासित
- रात्री फिरणारा :- निशाचर
- ठराविक कालानंतर प्रसिद्ध होणारे :- नियतकालिक
- चारित्र्यावर कसलाही ठपका नसणारा :- निष्कलंक
- नाणी पाडण्याचा कारखाना :- टाकसाळ
- फार दिवसांनी येणारी संधी वा शुभकाल :- पर्वणी
- शेतात बांधलेली पडवी :- पडळ
- दुसऱ्याच्या जिवावर जगणारा :- परोपजीवी
- दुसऱ्या देशात जाणे :- परदेशगमन
- भोवतालचा प्रदेश :- परिसर
- एकमेकांवर अवलंबून असणारे :- परस्परावलंबी
- रोग्याची शुश्रुषा करणारी :- परिचारिका
- पाच वडांचा समुदाय असलेली जागा :- पंचवटी
- विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश :- पंचक्रोशी
- पंधरा दिवसांचा कालावधी :- पंधरवडा
- चिखलात उगवलेले कमळ :- पंकज
- घोडे बांधण्याची जागा :- पागा
- पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे :- पाक्षिक
- दगडासारखे कठोर हृदय असलेला :- पाषाणह्रदयी
- पश्चिम भागातील (पश्चिमेकडील देशांमधील) लोक :- पाश्चिमात्य
- पाण्याखालून संचार करणारी युद्धनौका :- पाणबुडी
- धर्मार्थ मोफत पाणीवाटपाची केलेली सोय :- पाणपोई
- ज्यामधून आरपार दिसू शकते असे :- पारदर्शी
- शेतातून जाणारी अरुंद वाट (पायवाट) :- पाणंद
- पाणी साचलेली जागा :- पाणथळ
- गुरांना पोसण्याचे ठिकाण :- पांजरपोळ
- पूर्वी जन्मलेला :- पूर्वज
- पूर्वेकडे तोंड करून असलेला :- पुर्वाभिमुखी
- पिण्यास योग्य असा द्रव :- पेय
- ज्याला आईवडील नाहीत असा :- पोरका
- अर्थ न समजता केलेले पाठांतर :- पोपटपंची
- पोरबुद्धीने वागणारा :- पोरकट
- पूर्व भागातील (पूर्वेकडील देशांतील) लोक :- पौर्वात्य
- पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा :- प्रदर्शन
- लोकांच्या मताने चाललेले राज्य :- प्रजासत्ताक
- जगाचा नाश होण्याची वेळ :- प्रलयकाळ
- पाहण्यास जमलेले लोक :- प्रेक्षक
- शत्रूला सामील झालेला :- फितूर
- ज्याने खूप काही ऐकले आहे असा :- बहुश्रुत
- अनेक प्रकारची सोंगे आणून इतरांची करमणूक करणारा :- बहुरुपी
- ज्याला वाळीत टाकले आहे असा :- बहिष्कृत
- बारा लोकांनी (अनेकांनी) केलेला कारभार :- बारभाई कारभार
- कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पाडणे :- बिनबोभाट
- बुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा असे लोक :- बुद्धिप्रामाण्यवादी
- ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक :- बुद्धिजीवी
- चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला प्रदेश :- बेट
- वारस नसलेला :- बेवारशी
- घरदार नसलेला :- बेघर
- कोणतीही तक्रार न करता :- विनातक्रार, बिनतक्रार
- निरर्थक गोष्टी किंवा गप्पा :- भाकडकथा
- राजाची स्तुती करणारा :- भाट
- जमिनीवर राहणारा :- भूचर
- मन मानेल तितके :- मनसोक्त
- जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे :- मर्त्य
- सर्वांशी मिळूनमिसळून वागणारा :- मनमिळाऊ
- माकडांचा खेळ करणारा :- मदारी
- जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहेत अशी :- मदीराक्षी
- स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे :- मनमौजी
- मशाल धरणारा नोकर :- मशालजी
- मन हरण करणारा (मनाला मोहविणारा) :- मनोहर
- मोठेपणा मिळविण्याची किंवा मोठे ध्येय साध्य करण्याची इच्छा :- महत्वाकांक्षी
- दुसन्याला ठार मारण्याकरिता पाठविलेला माणूस :- मारेकरी
- इतरांना मार्ग दाखविणारा :- मार्गदर्शक
- डोक्यावरून ओझे वाहून नेणारा :- माथाडी
- पिकांची राखण करण्यासाठी घातलेला मांडव :- मचाण
- घरातील मधले दालन :- माजघर
- म्हातारपणामुळे बुद्धीला आलेला चंचलपणा :- म्हतारचळ
- मुद्द्याला धरून असलेले :- मुद्देसूद
- मूर्तीची पूजा करणारा :- मूर्तिपूजक
- मूर्तीचा नाश करणारा :- मूर्तीभंजक
- ज्याने मृत्यूवर विजय मिळविला आहे असा :- मृत्युंजय
- अतिशय मूर्खपणा करणारा मूर्खातील मूर्ख :- मुर्खशिरोमनी
- मोजका आहार नेमाने घेणारा :- मिताहारी
- जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षक आहेत अशी :- मीनाक्षी
- उपकाराखाली ओशाळा बनलेला :- मिंधा
- ढगांनी आच्छादिलेला :- मेघाच्छादित
- जिचे डोळे हरिणांच्या डोळ्यांप्रमाणे सुंदर आहेत अशी :- मृगनयना
- शक्य असेल त्याप्रमाणे :- यथाशक्ती
- रत्ने जडविलेले असे :- रत्नजडीत
- कलेची आवड असणारा :- रसिक
- तोफ असलेला गाडा :- रणगाडा
- हमखास लागू पडणारा (अचूक गुणकारी) उपाय :- रामबाण
- पहाटेचा सुखद समय :- रामप्रहर
- रोजच्या हिशोंबाची टिपणवही :- रोजखर्डा
- लाखो रुपये जवळ असलेला :- लखपती, लक्षाधीश
- डोंगरात कोरलेले मंदिर :- लेणी
- लोखंडाच्या वस्तू बनविणारा :- लोहार
- सामान्य माणसांमध्ये न आढळणारा :- लोकोत्तर
- लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य :- लोकशाही
- भाषण करण्याची कला :- वक्तृत्व
- झाडांच्या सालीपासून बनविलेले वस्त्र :- वल्कल
- वनात राहणारे लोक :- वनवासी
- सभेत भाषण करणारा :- वक्ता
- आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम वा ममता :- वात्सल्य
- डाव्या कुशीवर झोपणे :- वामकुक्षी
- दुपारच्या भोजनानंतरची अल्पशी निद्रा :- वामकुक्षी
- प्रतिवर्षी प्रकाशित होणारे :- वार्षिक
- व्यभिचारी स्त्री :- व्यभिचारिणी
- सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय :- वाचनालय
- ज्याची पत्नी मृत्यू पावली आहे असा :- विधुर
- जिचा पती मृत्यू पावला आहे अशी :- विधवा
- गावाचे प्रवेशद्वार :- वेस
- वेश बदलणे :- वेषांतर
- जेवण झाल्यानंतर शंभर पावले म्हणजे थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ :- शतपावली
- शरण आलेला :- शरणागती
- कधीही नष्ट न होणारे :- शाश्वत
- एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा व्यक्त करणे :- शाप
- राजाचा शिक्का सांभाळणारा :- शिक्केनीस
- अतिशय लवकर रागावणारा :- शीघ्रकोपी
- चांदण्या रात्रींचा पंधरवडा :- शुक्लपक्ष
- शेजाऱ्यांशी वागण्याची पद्धत वा नीतिनियम :- शेजारधर्म
- सभेत निर्भयपणे भाषण करणारा :- सभाधीट
- मोफत कोरडा शिधा मिळण्याची सोय/ठिकाण :- सदवर्त
- योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणारा वा कृती करणारा :- समयसूचक
- जुन्या चालीरीतींना चिकटून राहणारा :- सनातनी
- जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री :- सधवा
- समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक :- समाज कंटक
- जुन्या रूढी, परंपरा यांचे काटेकोर पालन करणारा :- सनातनी
- सर्वात उंच :- सर्वोच्च
- चांगले आचरण असणारा :- सदाचारी
- कष्ट न करता सहजरीतीने मिळणारे :- सहजसाध्य
- एकाच काळात होऊन गेलेले :- समकालीन
- संसाराचा त्याग केलेला :- संन्याशी
- वृत्तपत्र वा तत्सम प्रकाशनांचे संपादन करणारा :- संपादक
- जेथे दोन नद्या एकत्र मिळतात ते स्थान :- संगम
- सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश :- संधिप्रकाश
- मोकळेपणाने फिरण्यास मनाई :- संचारबंदी
- आठवड्याने प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र :- साप्ताहिक
- सांगितले तेवढेच काम करणारा :- सांगकाम्या
- उंटावरून टपाल नेणारा स्वार सांडणी :- स्वार
- सुंदर शब्दांतील बोधपर वाक्य :- सुभाषित
- सुखाच्या मागे लागलेला :- सुखलोलुप
- सुखाने काळ कंठणारा (जीवन जगणारा) :- सुखवस्तू
- सुखाच्या आहारी गेलेला :- सुखासीन
- लाकडाच्या वस्तू बनविणारा :- सुतार
- सोन्याच्या वस्तू बनविणारा :- सोनार
- फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा :- स्वार्थी
- एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केली गेलेला :- स्थानबद्ध
- स्वतःवर अवलंबून असणारा :- स्वावलंबी
- स्वत्वाचा अभिमान असणारा :- स्वाभिमानी
- स्वत्वाच्या अभिमानाचा अभाव असलेला :- स्वाभिमानशून्य
- ज्याला जिकडे वाट फुटेल तिकडे :- सैरावैरा
- कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर असते असा :- स्थितप्रज्ञ, स्थिरमती स्थिरबुद्धी
- स्वतःशी केलेले भाषण :- स्वगत
- जिची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे अशी :- सिंहकटी
- मागील कालखंडाचा आढावा घेणे :- सिंहावलोकन
- राजाचे बसावयाचे आसन :- सिंहासन
- ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा :- हतभागी
- बाजार-व्यवहार बंद ठेवण्याची सामुदायिक कृती :- हरताळ
- हत्ती बांधण्याची जागा :- हत्तीखाना
- आपल्याच मताप्रमाणे चालणारा :- हटवादी
- यज्ञात टाकावयाचा भाग किंवा पदार्थ :- हविर्भाव
- प्रश्न विचारताच त्याचे योग्य उत्तर ताबडतोब देणारा :- हजरजबाबी
- मनाला पाझर फोडणारी :- हृदयद्रावक
- आपल्याच मताप्रमाणे चालणारा :- हेकेखोर
- प्रगतीसाठी धडपडणारा :- होतकरू
- कष्ट करून उपजीविका करणारा :- श्रमजीवी
- भाषण ऐकण्यास जमलेले लोक :- श्रोते
- सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे :- षणमासिक
- तीन महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे :- त्रैमासिक
आपण अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द जाणून घेतले. तुम्हाला वाचताना नक्कीच मज्जा आली असेल. या शब्दांचा तुम्ही तुमच्या बोलण्यात नक्कीच उपयोग कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास इतरांनाही पाठवा.
यापुढील लेखात आपण मराठीतील वाक्प्रचार जाणून घेणार आहोत. नक्की वाचा आणि स्वतःची व इतरांची मराठी समृद्ध करा. धन्यवाद?